वसई -विरारमध्ये प्रदूषणाची पातळी तीव्र  pudhari photo
पालघर

Vasai Virar pollution : वसई -विरारमध्ये प्रदूषणाची पातळी तीव्र

नागरिकांच्या खोकला, श्वसन विकार, ॲलर्जी तक्रारीत वाढ

पुढारी वृत्तसेवा

विरार ः वसईविरार परिसरात गेल्या काही दिवसांपासून हवेतील प्रदूषणाची स्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे. शहरातील हवेची गुणवत्ता निर्देशांक मागील पंधरा दिवसांपासून सतत 105 ते 130 या दरम्यान नोंदला जात आहे. ही पातळी आरोग्यास अपायकारक मानली जात असून संवेदनशील गटांसाठी धोक्याचा इशारा देणारी आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे या मोठ्या शहरांबरोबर आता वसईविरार महानगरपालिकेच्या हद्दीतही प्रदूषणाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. धुळीमुळे नागरिकांना खोकला, श्वसनाचा त्रास, डोळ्यांची जळजळ आणि ॲलर्जीच्या तक्रारी वाढताना दिसत आहेत.

महानगरपालिकेने वाढत्या धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. शहरातील सर्व बांधकाम प्रकल्पांना सक्तीचे आदेश देऊन कामाच्या ठिकाणी धूळ कमी करण्यासाठी सतत पाणी फवारणी करणे, बांधकाम साहित्य रस्त्यावर न टाकणे, गाड्यांवर जाळी आणि आच्छादन ठेवणे, तसेच उघड्या जागेत धूळ उडणार नाही यासाठी संरक्षणात्मक उपाय करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर दोन हजार ते दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची कारवाई सुरू आहे. वाळू, माती, कचरा किंवा बांधकाम साहित्य वाहतूक करणाऱ्या गाड्यांवरही कठोर तपासणी सुरू असून आच्छादन न लावणाऱ्या वाहनांवर तात्काळ दंडात्मक कारवाई केली जात आहे.

शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि वस्तीभागांमध्ये संध्याकाळी आणि सकाळी धुळीचे प्रमाण अधिक वाढताना दिसते. नागरिकांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होत असून आरोग्य विभागाने लहान मुलांनी, वृद्धांनी आणि श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असा सल्ला दिला आहे. हवेतील प्रदूषणाची पातळी दोनशेच्या पुढे गेल्यास अधिक कठोर निर्बंध लागू करण्याची तयारी महापालिकेने दर्शविली आहे.

दरम्यान, वसईविरारमधील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‌‘राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रम‌’अंतर्गत बत्तीस कोटी रुपयांचा निधी महानगरपालिकेला मंजूर झाला होता. पुढील पाच वर्षांत हा निधी एकशे पंचवीस कोटी रुपयांपर्यंत वाढेल, असे शासनाने जाहीर केले होते. मात्र नागरिकांच्या मते, या निधीचा प्रभाव जमिनीवर दिसत नाही.

अनेक भागांत धुळीचे प्रमाण पूर्वीइतकेच राहिले असून, रस्ते स्वच्छता आणि धूळ नियंत्रित करणारी यंत्रणा मर्यादित ठिकाणीच दिसते. काही भागांत तर धुक्यासारखे प्रदूषण रोज सकाळ-संध्याकाळ दिसत असल्याने निधीचा वापर नेमका कुठे होत आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बत्तीस कोटींच्या निधीतील मोठा हिस्सा पुढील काही महिन्यांत आधुनिक धूळशामक यंत्रणा, रस्ते स्वच्छता वाहने आणि निरीक्षण साधनांसाठी खर्च केला जाणार असून त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

वसईविरारमधील वाढते धुळप्रदूषण आता गंभीर आरोग्य समस्या बनत आहे. प्रशासन, बांधकाम क्षेत्र, वाहतूक विभाग आणि नागरिक यांनी संयुक्तपणे प्रयत्न केले तरच प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येईल, अशी जनतेची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT