Vasai Virar Pothole Issue 
पालघर

Vasai Virar Pothole Issue | चंदनसार-विरार स्टेशन मार्गाची दुरावस्था, खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांसह चालक हैरान

Vasai Virar Pothole Issue | वसई-विरारमधील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर

पुढारी वृत्तसेवा

मनवेलपाडा : पुढारी वृत्तसेवा
वसई-विरार शहराच्या विकासाच्या मोठमोठ्या दाव्यांदरम्यान शहरातील रस्त्यांची दुरावस्था मात्र नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चंदनसार रोडपासून विरार स्टेशनपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठेमोठे खड्डे आणि भगदाडे पडल्याने वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असतानाही संबंधित यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

विशेषतः सोलंकी शाळेसमोरील रस्त्याची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे. या ठिकाणी रस्त्यावर मोठेमोठी भगदाडे पडली असून खड्ड्यांची खोली आणि रुंदी वाढत चालली आहे. वाहनचालकांना हे खड्डे चुकवताना अचानक ब्रेक मारावे लागतात किंवा वाहन वळवावे लागते. त्यामुळे दुचाकीस्वारांसह पादचारी आणि इतर वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. परिणामी दुचाकीस्वारांचे वाहनावरील नियंत्रण सुटण्याची शक्यता वाढली आहे.
रात्रीच्या वेळी तर परिस्थिती आणखी धोकादायक बनत असून, पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्यास खड्डे चुकवणे वाहनचालकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

"महानगरपालिका नेमकी कोणत्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे?" असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. रस्त्याची ही अवस्था अनेक दिवसांपासून नागरिकांच्या निदर्शनास येत असतानाही त्यावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना का केली जात नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याची दुरुस्ती केवळ वरवरची न करता खड्डे बुजवून रस्त्याचे मजबुतीकरण आणि आवश्यक त्या ठिकाणी नव्याने डांबरीकरण करणे गरजेचे आहे. अन्यथा पावसाळ्यात खड्ड्यांची संख्या आणि आकार आणखी वाढण्याची शक्यता आहे. शहराच्या विकासाचा दाखला देताना मोठमोठ्या प्रकल्पांची चर्चा केली जाते; मात्र सामान्य नागरिक दररोज ज्या रस्त्यावरून प्रवास करतो त्या रस्त्याची अवस्था सुधारण्याकडे दुर्लक्ष होत असेल तर विकासाचा नेमका फायदा कोणाला? असा सवाल आता नागरिकांकडून केला जात आहे.

महानगरपालिकेने एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता तातडीने या मार्गाची पाहणी करून धोकादायक खड्डे बुजवावेत आणि रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. एखाद्या व्यक्तीचा या खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीव गेल्यानंतरच महानगरपालिकेचे डोळे उघडणार का? असा संतप्त सवाल नागरिक करत असून, आता तरी या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

अपघात आणि सुरक्षेचा धोका

  • सोलंकी शाळेसमोर बिकट अवस्था : रस्त्यावर पडलेल्या मोठ्या भगदाडांमुळे दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटून अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.

  • रात्रीच्या प्रवासात धोका : रस्त्यावर पुरेशा प्रकाशव्यवस्थेचा अभाव असल्याने रात्रीच्या वेळी पाणी साचलेले खड्डे वाहनचालकांच्या निदर्शनास येत नाहीत.

  • नागरिकांची मागणी : वरवरची डागडुजी न करता रस्त्याचे पूर्ण मजबुतीकरण व नव्याने डांबरीकरण करण्याची मागणी महापालिकेकडे केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT