POP Ganesh Idol Rule Pudhari
पालघर

POP Ganesh Idol Rule: प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर लाल चिन्ह बंधनकारक

मूर्तिकार-विक्रेत्यांना शासनाच्या नियमांचे पालन करण्‍याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

मनवेलपाडा: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार करण्यात येणाऱ्या मूर्तींच्या विक्रीबाबत शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन वसई-विरार शहर महानगरपालिकेने सर्व मूर्तीकार आणि मूर्ती विक्रेत्यांना केले आहे.

पीओपी मूर्तींची ओळख स्पष्टपणे व्हावी आणि शासनाच्या पर्यावरणविषयक निर्देशांचे पालन सुनिश्चित व्हावे, यासाठी मूर्तीच्या मागील बाजूस लाल रंगाचे गोलाकार चिन्ह करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने १ ऑगस्ट २०२५ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयासह १ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयामध्ये पीओपी मूर्तींच्या उत्पादक व विक्रेत्यांसाठी काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार पीओपीपासून तयार केलेली मूर्ती विक्री करताना तिच्या मागील बाजूस स्पष्टपणे दिसेल अशा पद्धतीने ऑईल पेंटने लाल रंगाचे गोलाकार चिन्ह करणे आवश्यक आहे.

यासोबतच पीओपी मूर्तींची विक्री करताना त्याची नोंदवही ठेवणेही आवश्यक केले आहे. त्यामुळे कोणत्या मूर्तीकाराने किंवा विक्रेत्याने किती पीओपी मूर्तींची विक्री केली, याबाबतची माहिती नोंदवून ठेवणे अपेक्षित आहे.

या निर्देशांची माहिती देण्यासाठी पालिका मुख्यालयात यापूर्वीच मूर्ती उत्पादक आणि विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत प्रशासनाकडून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

महानगरपालिकेने आता पुन्हा एकदा सर्व मूर्तीकार आणि मूर्ती विक्रेत्यांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मूर्ती विक्रीपूर्वी लाल रंगाचे गोल चिन्ह दिसेल याची खात्री करावी, तसेच विक्रीची आवश्यक नोंदवही ठेवावी, अशा सूचना दिल्या आहेत.

प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करावे

पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने शासनाकडून वेळोवेळी विविध उपाययोजना आणि नियम लागू करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने पीओपी मूर्तींची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी आणि संबंधित यंत्रणेला त्याबाबत आवश्यक माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी ही चिन्हांकन पद्धत महत्त्वाची मानली जात आहे.

मूर्तीकार व विक्रेत्यांनी शासनाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष न करता आवश्यक ती कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. तसेच नियमांचे पालन करताना प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करावे, असेही स्पष्ट केले आहे.

पीओपी मूर्ती विक्री करणाऱ्या प्रत्येक मूर्तीकार व विक्रेत्याने मूर्तीच्या मागील बाजूस लाल रंगाचे गोलाकार चिन्ह करणे आवश्यक असल्याने यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात या नियमाची अंमलबजावणी महत्त्वाची ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT