Vasai Virar City Municipal Corporation file photo
पालघर

Vasai Virar Municipal Corporation Election : बविआ-ठाकरे शिवसेना बोलणी फिसकटली

काँग्रेस,मनसेबरोबर आघाडीसाठी बोलणी सुरू; मनसेलाही सोबत घेणार असल्याचे संकेत

पुढारी वृत्तसेवा

वसई ः वसई-विरार महापालिकेसाठी बहुजन विकास आघाडी आणि ठाकरे शिवसेनेची सुरू असलेली बोलणी चिन्ह कुठले वापरावे या मुद्दयावरू चर्चा फिसकटल्याने आता बहुजन विकास आघाडी काँग्रेससोबत चर्चा करत आहेत. तसेच मनसेलाही सोबत घेणार असल्याचे संकेत बविआने दिले आहेत.

मुंबईसह अनेक ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर वसई-विरारमध्ये वेगळे चित्र पहायला मिळत आहे. वसई-विरार महापालिकेमध्ये राज ठाकरे यांची मनसे आणि हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी एकत्र लढणार आहेत. विशेष म्हणजे मनसेचे उमेदवार हे बविआच्या शिट्टी या चिन्हावर लढणार आहेत. त्याचवेळी ठाकरेंची शिवसेना मात्र स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे.

ठाकरे बंधूंनी राजकीय युती जाहीर केली आणि बहुतांश ठिकाणी एकत्र लढण्याचा निर्धारही केला. मात्र अवघ्या काही दिवसांतच वेगळे चित्र निर्माण झाले. वसई-विरारमध्ये मात्र दोन्ही ठाकरे बंधूंचे पक्ष वेगवेगळे लढणार आहेत. एकत्र लढायचं असेल, भाजप-शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर आमच्या चिन्हावर लढा अशी बविआची अट होती. मनसेने ती मान्य केली, मात्र ठाकरेंची शिवसेना वेगळी लढणार आहे.

वसई-विरार महापालिकेत 29 प्रभाग असून, 115 सदस्य संख्या आहे. यापैकी 58 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर 57 जागा पुरुषांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जाती (एस.सी.) आणि अनुसूचीत जमाती (एस.टी.) साठी प्रत्येकासाठी 5 आरक्षण आहेत. तर यात प्रत्येकी 2 महिलांसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहेत. तसेच 74 जागा या सर्वसाधारण प्रवर्गाकरीता राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

जर वेगळे चिन्ह घेतले तर मी त्यासोबत जाईन. माझ्या कडून चिन्हाचा विषय झालेला आहे. आमचे पाच कार्यकर्ते जरी निवडून येत असतील तर त्यासाठी चिन्हाचा प्रश्न नाही, निवडून येणे महत्त्वाचे आहे. ठाकरे गटाला माझी विनंती आहे, त्यांनी वेगळं लढू नये. भाजपला जर रोखायचं असेल तर एकत्र या. किती जागा येणार यापेक्षा भाजप जिंकणार का हे महत्वाचे आहे. ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली सगळीकडे जागावाटप पूर्ण झाले आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत, काँग्रेस देखील सोबत आहे.
अविनाश जाधव, ठाणे जिल्हाध्यक्ष, मनसे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT