मंगूर मासा  pudhari photo
पालघर

Mangur fish sale : वसई-विरारमध्ये मंगूर माशांची सर्रास विक्री

आरोग्य, पर्यावरणाला धोका

पुढारी वृत्तसेवा

विरार ः देशभरात बंदी घालण्यात आलेल्या मंगूर माशांची विक्री वसई-विरार परिसरात सर्रासपणे सुरू असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक आरोग्याची हेळसांड करणार्‍या या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

मंगूर मासा हा चिखलात वाढणारा आणि इतर माशांवर ताव मारणारा प्रजातीतील आहे. हा मासा रोगजन्य बॅक्टेरियांचे वाहक असल्याने तो आरोग्यास अत्यंत घातक ठरतो. त्यामुळे केंद्र सरकारने 2000 साली याच्या उत्पादन व विक्रीवर बंदी घातली होती. मात्र, तरीही वसई, विरार, नालासोपारा, तसेच ठाणे व मुंबई भागात 100 ते 150 रुपये किलो दराने याची खुलेआम विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. या माशांचे सेवन केल्याने शरीरात जंतुसंसर्ग होणे, पचनसंस्थेवर परिणाम होणे, त्वचारोग, मधुमेह, यकृत व मूत्रपिंडांचे विकार यांसारखे गंभीर आजार उद्भवू शकतात, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

याशिवाय, या माशांची आक्रमक प्रवृत्ती ही जलस्रोतांतील जैवविविधतेसाठी देखील घातक ठरत आहे. स्थानिक माशांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने पर्यावरणसुद्धा धोक्यात आले आहे.

हे मासे शेती पद्धतीने पाळले जात असून, त्यानंतर स्थानिक बाजारात विकले जात आहेत. संबंधित प्रशासन व मत्स्य व्यवसाय विभागाने वेळेवर कारवाई न केल्याने अशा प्रकारांना उत्तेजन मिळत असल्याचे चित्र आहे. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप ठोस पावले उचलली गेलेली नाहीत, ही चिंतेची बाब आहे.

मंगूर मासा शरीरात गंभीर विषारी परिणाम करतो. याचे सेवन केल्याने अनेक जणांना फोड, त्वचारोग, अपचन तसेच दीर्घकाळ चालणारे संक्रमण होत असल्याचे दिसून आले आहे. अशा प्रकारांवर तातडीने बंदी घालणे आवश्यक आहे.
डॉ. संजय माळी, त्वचारोगतज्ज्ञ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT