वसई : आज सतत पाचव्या दिवशीही वसई विरार मध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला असून, निचऱ्या अभावी शहराच्या सखल भागात साचून राहिले पाणी जनतेच्या डोळ्यातून पाणी आणायला कारण ठरले आहे. जुलै महिन्यात पाचव्या दिवसापर्यंत सातत्याने लागलेला आणि अशा स्वरूपाचा पडलेला सुमारे 1837 मिमी हा रेकॉर्ड ब्रेक पाऊस असून, शहरात पाच दिवस पाणी साचून राहण्याची ही पहिलीच वेळ असल्याने जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. चालू हंगामातील गेल्या पाच दिवसात झालेला पाऊस हा सरासरी दोन तृतीयांश इतका पडला आहे.
भर पावसात पाणीपुरवठ्यात अडचणी
याचा मोठा फटका विद्युत पुरवठा खंडित होण्यामुळे बसला असून, परिणामी आज त्याचा पाणी पुरवठ्यावर गंभीर परिणाम झालेला पाहायला मिळाला. शेकडो इमारतींमध्ये पिण्याची पाणी चढवताना आल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक आजही संपूर्ण कोलमडून पडल्याने अनिश्चित वेळेत आणि पूर्व सुचनेशिवाय येतील तश्या लोकल ट्रेन धावत होत्या. नालासोपारा आणि वसई रोड रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकवरील पाणी कमी झाल्यामुळे आज विरार पर्यंत ट्रेन जात होत्या. आजची परिस्थिती लक्षात घेऊन पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या दि. ८ जुलै रोजी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
वसई पूर्वेच्या विद्युत सबस्टेशन मध्येही दीड फुटापर्यंत पाणी साचले असून, ज्या ज्या ठिकाणी विद्युत रोहित्रे पाण्यात बुडाली आहेत, अशा विभागात विद्युत वितरण विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव विद्युत पुरवठा खंडित करून ठेवला आहे. त्यामुळे शहराच्या काही ठिकाणी गेले 24 तास तर काही ठिकाणी गेले 36 तास आणि काही ठिकाणी तब्बल 48 तासापासून विद्युत पुरवठा खंडित करून ठेवण्याची वेळ आली आहे. प्रदीर्घकाळ वीज खंडित असल्याने पाणीपुरवठ्याप्रमाणेच विविध समस्यांना विजेअभावी जनतेला सामोरे जावे लागत आहे.
वसई विरार मध्ये पावसाळ्यात सरासरी सुमारे 3000 मिलिमीटर पाऊस होत असतो. मात्र निसर्गाने रौद्र स्वरूप धारण केले असल्यामुळे यंदा अवघ्या पाच दिवसात 1837 मिमी म्हणजे यंदाच्या सीजन मधील सरासरी दोन तृतीयांश पाऊस पडून झाला आहे. परिणामी पाणी निचऱ्या अभावी शहरातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असून, हा निसर्गाचा प्रकोप आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी अशा कोणावरही एकतर्फी टीका करणे, उचित ठरणार नाही.
-- नारायण मानकर, माजी महापौर
आपत्कालिन मदतीसाठी टोल फ्री नंबर
वसई विरार शहर महानगरपालिका नागरिकांच्या सेवेसाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत असून नागरिकांनी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या १८००२६७३८९८ व १८००२३३४३५३ या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकांवर तसेच ७०५८९१११२५ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
चार दिवसांपासून वसई रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाणे बंद!
गेल्या चार दिवसांपासून वसईरोड रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाणे बंद असल्याचा प्रकार समोर आला असून, या पोलीस ठाण्याचा ताबा साचलेल्या पाण्याने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. वसईरोड लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मीरारोड ते वैतरणा या रेल्वे स्थानकांदरम्यानचा रेल्वे मार्ग येतो. वसई विरार जिल्हा काँग्रेसचे नवघर-माणिकपूर ब्लॉक अध्यक्ष विल्फ्रेड डिसोझा यांनी या पोलीस ठाण्याचा कटू अनुभव घेतला.
याबाबत अधिक माहिती देताना विल्फ्रेड डिसोझा म्हणाले की, "आमच्या चुळणा गावातील एका मित्राचे पाकीट हरवले होते. त्यामध्ये महत्त्वाची कागदपत्रे आणि बँकेची कार्डे होती. नवीन कागदपत्रे मिळवण्यासाठी पोलीस तक्रार आवश्यक असल्याने तो दोन वेळा मुसळधार पावसात वसई रेल्वे पोलीस ठाण्यात गेला. मात्र, दोन्ही वेळा पोलीस ठाणे बंद होते. संपूर्ण पोलीस ठाण्यात पाणी साचले होते. दोन कर्मचारी उपस्थित होते, पण कोणतेही काम सुरू नव्हते. तीसऱ्या दिवशी मी स्वतः कमरेभर पाण्यातून पोलीस ठाण्यात गेलो. मात्र, तेव्हाही परिस्थिती आणखी बिकट होती. आमची केवळ किरकोळ तक्रार होती. जर याच काळात एखादा गंभीर गुन्हा किंवा मोठा अपघात झाला असता, तर त्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल करीत, या पोलीस ठाण्याला कायमस्वरूपी कुलूप लावण्याची मागणी त्यांनी केली असून, या संदर्भात लवकरच काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.