Gas Cylinder Black Market File Photo
पालघर

Gas Cylinder Black Market: वसई-विरारमध्ये गॅसचा काळाबाजार सुरू!सिलिंडरसाठी ग्राहकांची धावपळ, ग्राहकांवर आर्थिक भुर्दंड

वसई-विरारमध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या कथित काळाबाजारामुळे ग्राहकांची नाराजी वाढली आहे. अधिकृत दराने मिळणाऱ्या सिलिंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत असून, काही ठिकाणी २,५०० ते ३,००० रुपयांपर्यंत विक्री होत असल्याची तक्रार आहे.

पुढारी वृत्तसेवा

विरार: आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसच्या किमती आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेचा प्रश्न यापूर्वीच चर्चेत आला होता. आता युद्धाची धग काही प्रमाणात निवळलेली असतानाही वसई-विरार शहरात घरगुती गॅस सिलिंडरच्या कथित काळाबाजाराचे चित्र समोर येत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांमध्ये नाराजी वाढली आहे.

अधिकृत दराने मिळणारा सिलिंडर मिळविण्यासाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत असून, काही ठिकाणी अधिक पैसे मोजून सिलिंडर घेण्याची वेळ ग्राहकांवर येत असल्याची तक्रार आहे.

घरगुती वापरासाठी साधारण हजार रुपयांचा गॅस सिलिंडर काळ्या बाजारात सध्या दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांपर्यंत विकला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नियमित दराने गॅस मिळत नसल्यास नाईलाजाने जादा पैसे मोजून सिलिंडर घेण्याची वेळ ग्राहकांवर येत आहे.

आधीच महागाईने त्रस्त असलेल्या कुटुंबांच्या घरखर्चाचे गणित या प्रकारामुळे आणखी बिघडत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसची मागणी वाढल्याने काही भागांत सिलिंडर मिळविताना ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते.

अनेक कुटुंबांमध्ये या काळात स्वयंपाकासाठी गॅसची गरज वाढते. मात्र, मागणीच्या तुलनेत वेळेत सिलिंडर उपलब्ध न झाल्यास ग्राहकांची गैरसोय होत असून, या परिस्थितीचा गैरफायदा काहीजण घेत असल्याचा आरोप केला जात आहे. गॅस सिलिंडरचे पुस्तक केल्यानंतरही वेळेवर वितरण होत नसल्याच्या तक्रारी काही ग्राहकांकडून करण्यात येत आहेत.

बुकिंग करूनही सिलिंडर मिळण्यासाठी विलंब होत असल्याने ग्राहकांना बाहेरून जादा पैसे देऊन सिलिंडर मिळवावा लागत आहे. त्यामुळे अधिकृत वितरण व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

घरगुती गॅस हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक घटक असल्याने त्याच्या वितरणात पारदर्शकता आणि नियमितता राखणे गरजेचे आहे.गॅस सिलिंडरसाठी जादा पैसे मोजावे लागत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक गणितावर थेट परिणाम होत आहे.

विशेषतः मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मर्यादित कुटुंबांना वाढीव दराचा मोठा फटका बसत आहे. अधिकृत दराने सिलिंडर उपलब्ध असताना ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम आकारली जात असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. गॅस वितरक संस्था तसेच काळ्या बाजारात सिलिंडर विकणाऱ्या व्यक्तींची तपासणी करून अनियमितता आढळल्यास तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच ज्या ग्राहकांनी गॅस सिलिंडरचे बुकिंग केले आहे, त्यांना वेळेत आणि योग्य दरात सिलिंडर मिळेल, याची व्यवस्था करण्याची मागणीही केली जात आहे.

गॅस सिलिंडरचा काळाबाजार सुरू असल्याचे आढळून आल्यानंतरही संबंधित यंत्रणा याकडे किती गांभीर्याने पाहणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. गॅस वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून ग्राहकांना पुरवठा करणे, जादा पैसे घेणाऱ्यांवर कारवाई करणे आणि काळ्या बाजाराला आळा घालणे, या तीनही बाबींवर तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT