वसई : नालासोपारातील जमीनींच्या खरेदी-विक्री व्यवहारात खरेदीदाराला नफा होण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य शासानाचा कोट्यावधी रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडवल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हा सहनिबंधक दिपक पाटील यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. त्यामुळे मुद्रांक शुल्क घोटाळ्याची अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्हा सहनिबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना दिपक पाटील यांनी त्यांच्या कालावधीत अभिनिर्णित केलेल्या प्रकरणांची आणि नोंदणी केलेल्या दस्तांची सर्वकष तपासणी या विशेष तपासणी पथकामार्फत करण्यात येणार आहे.दिपक पाटील यांच्या कालावधीत साई स्वामी रियल्टर्स एल.एल.पी. यांनी अधिनिर्णयासाठी सादर केलेल्या मौजे आचोळे, ता.वसई येथील सर्वे.नं. 46 / ब / पै /3 या मिळकत क्षेत्राचे खरेदीखत वसई क्र. 3 या दुय्यम निबंधक कार्यालयात 4 ऑक्टोबर 2024 ला दस्त क्रमांक 21527 / 2024,21530/ 2024 आणि 21535/2024 अन्वये नोंद केले होते. मात्र या खरेदीखताच्या दस्ताची नोंदणी 34 कोटी 32 लाख, 50 हजार 40 रुपये इतके मुद्रांक शुल्क न भरता करण्यात आल्याचे आता उघड झाले आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा स्वराज्य अभियानाचे अध्यक्ष धनंजय गावडे यांनी हा घोटाळा उघड केला आहे. हा घोटाळा करताना राज्य शासनाचा तसेच चुकीच्या मार्गदर्शक सूचनांचा वापर करुन मिळकतीची किंमत कमी दाखवल्यामुळे आयकरापोटी केंद्र शासनाचा ही मोठ्या प्रमाणात महसूल जाणीवपूर्वक बुडवला असल्याची तक्रारही गावडे यांनी नोंदणी महानिरिक्षक आणि मुद्रांक नियंत्रकांकडे केली होती. त्यानुसार याप्रकरणी सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पालघर यांच्या काळात अभिनिर्णीत केलेल्या आणि नोंदणी झालेल्या दस्ताची चौकशी करुन महसूलाच्या वसुलीची कार्यवाही करण्याचे आदेश महसुल विभागाने दिले आहेत.
दिपक पाटील यांच्या या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नोंदणी उपमहानिरीक्षक आणि मुद्रांक उपनियंत्रक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपासणी पथक गठीत करण्यात आले आहे. त्यात साताराचे सहजिल्हा निबंधक संजय पाटील, छत्रपती संभाजीनगरचे सह दुय्यम निबंधक आबासाहेब तुपे, अहिल्यानगरचे सह जिल्हा निबंधक सुनिलकुमार भागवत, ठाणे शहरातील सहाय्यक नगररचनाकार ओंकार कदम, मुंबई उपनगराचे दुय्यम निबंधक प्रशांत कुमठकर, छत्रपती संभाजीनगराचे मुल्यांकन दुय्यम निबंधक रमेश लोखंडे, जळगावचे सह दुय्यम निबंधक संदीप पाटील, संभाजीनगराचे नोंदणी उपमहानिरिक्षक मनीष ईसाई यांचा समावेश आहे.