लांबलेल्या पावसाचा वसई तालुक्यातील रब्बी हंगामावर परीणाम pudhari photo
पालघर

Vasai rabi season rain impact : लांबलेल्या पावसाचा वसई तालुक्यातील रब्बी हंगामावर परीणाम

फुलोरा आणि फळधारणा सक्षम न झाल्याने पीक उत्पादन निम्म्यावर; किडीचाही प्रादुर्भाव

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : यंदा वसई तालुक्यातील रब्बी हंगामाला प्रतिकूल हवामानाचा मोठा फटका बसला असून रब्बी पिकांचे उत्पादन कमालीचे घटले आहे. पिकांची वाढ जोमदार दिसूनही फुलोरा आणि फळधारणा सक्षम न झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या हातात निम्म्याहून कमी उत्पादन आले आहे. लांबलेला पाऊस, जमिनीत टिकून राहिलेला अतिरिक्त ओलावा आणि बदलते वातावरण यामुळे रब्बी हंगाम अडचणीत सापडल्याचे चित्र आहे.

मागील वर्षी मे महिन्यात सुरू झालेला पाऊस दिवाळीपर्यंत कायम राहिला. जवळपास सहा महिने सुरू असलेल्या या पावसामुळे दिवाळीपूर्वी होणाऱ्या रब्बी पेरण्या लांबल्या. त्यानंतरही अनेक शेतांमध्ये ओहोळ आणि पाणी साचलेले राहिल्याने जमिनीत अतिरिक्त ओलावा टिकून राहिला. अशा परिस्थितीतही खरीपापेक्षा अधिक आर्थिक आधार देणाऱ्या रब्बी पिकांच्या आशेवर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या.

सुरुवातीला रब्बी पिकांनी चांगला जोम धरला. हरभरा, तूर, वाल, उडीद, मूग आणि तीळ या पिकांची वाढ समाधानकारक दिसत होती. मात्र फुलोऱ्यानंतर फळधारणा नीट न झाल्याने पिके कमकुवत पडली. काही ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली. परिणामी उत्पादनात मोठी घट झाली.

अनुभवी शेतकऱ्यांच्या मते, माळरानावरील किंवा उंच भागातील जमिनीत दिवाळीपूर्वी पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना तुलनेने काही प्रमाणात पीक मिळाले. तरीही ते समाधानकारक नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र ज्या शेतजमिनींमध्ये अतिरिक्त ओलावा अधिक होता, त्या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांना निम्म्यावर उत्पादन मिळाले आहे.

उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

वसई परिसरात खरीप हंगामातील भातशेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून असून ती खर्चिक आणि कष्टदायक मानली जाते. त्यामुळे अनेक शेतकरी रब्बी पिकांकडे आर्थिक आधार म्हणून पाहतात. कमी खर्च, कमी मेहनत आणि तुलनेने चांगला नफा मिळत असल्याने रब्बी पिकांकडे शेतकऱ्यांचा मोठा कल असतो. मात्र यंदाच्या प्रतिकूल वातावरणामुळे या पिकांचे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT