Vasai Paddy Harvesting Pudhari
पालघर

Vasai Paddy Harvesting: वसईत भात झोडण्यांच्या कामांची लगबग सुरू

मजुरीचे दर वाढल्याने शेतकऱ्यांचा खर्च वाढला; अखेरच्या टप्प्यात पावसाने ओढ दिल्याने उत्पादनात घट

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे: वसई तालुक्यातील ग्रामीण भागात खरीप हंगामातील भात कापणी आणि बांधणीची कामे जवळपास आटोपली असून आता भात झोडण्या आणि वारवण्यांना जोरदार सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील शेतशिवारांसह घरांच्या अंगणातही भात झोडण्याची लगबग दिसून येत आहे.

यंदा पारंपरिक खाचर-खळ्यांची जागा काही प्रमाणात प्लास्टिक ताडपत्रीने घेतली असून त्यावर लाकडी बाक, टेबल अथवा मोठे लाकडी ओंडके ठेवून भात झोडण्याचे काम केले जात आहे.

दरम्यान, मजुरांच्या वाढलेल्या मजुरीमुळे भात काढणीपश्चात प्रक्रिया शेतकऱ्यांना महागात पडत आहे. त्यातच पीक परिपक्व होण्याच्या अखेरच्या टप्प्यात पावसाने ओढ दिल्याने भात उत्पादनातही घट झाली आहे.

वसई तालुक्यात खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्रावर भातशेती केली जाते. यंदा साधारण पाच ते साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली होती. सुरुवातीच्या टप्प्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने भातपिकांची वाढ चांगली झाली होती.

मात्र, पीक दाणे भरण्याच्या आणि परिपक्व होण्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे अनेक भातखाचरांमधील पिके वेळेआधीच सुकली. परिणामी दाण्यांची भर कमी राहिल्याने अपेक्षित उत्पादन मिळाले नसल्याची शेतकऱ्यांची व्यथा आहे. दरम्यान, भातकापणी आणि बांधणीची कामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आता झोडणी व वारवणीच्या कामांना वेग दिला आहे.

मात्र, यंदा मजुरांच्या मजुरीत मोठी वाढ झाली आहे. एका मजुराला दिवसभरासाठी सुमारे ६०० रुपये मजुरी द्यावी लागत आहे. त्याशिवाय मजुरांचा येण्या-जाण्याचा खर्च, जेवण, चहा आणि नाश्ता यांचाही अतिरिक्त भार शेतकऱ्यांवर पडत आहे. त्यामुळे भात झोडणी आणि वारवणीचा खर्च वाढून शेतीचे आर्थिक गणित अधिकच बिघडत आहे.

एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट, तर दुसरीकडे वाढती मजुरी आणि शेतीचा खर्च अशा दुहेरी संकटात वसईतील भात उत्पादक शेतकरी सापडले आहेत. वर्षभर मेहनत करूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT