खानिवडे : वसईत सकाळपासून पहाटे गारवा, संध्याकाळपर्यंत ऑक्टोबर हिटचा तडाखा तर मध्येच परतीच्या पावसाची दमदार हजेरी अशा हवामानातील बदलांमुळे वसईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वसईकरांना ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र, खाजगी दवाखाने, शासकीय दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. सध्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू आहे. पालघरमध्येही अनेक तालुक्यात परतीचा पाऊस झाला. वसईत गेल्या काही दिवसात दुपारी कडक ऊन आणि रात्री थंडावा जाणवतो. त्यातच आता पावसाने जरी विश्रांती घेतली असल्याने प्रत्येक रस्त्यांवर जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांच्या वर्दळीने तेथून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या नाका तोंडात उडणारी धूळ जात आहे यामुळे सद्ध्या घश्याचे विकार आणि साथीचे आजार जड्डू लागले आहेत. हे रुग्ण वाढत असल्याने वसईच्या खाजगी आणि सार्वजनिक दवाखान्यात सध्या रुग्णांची मोठी गर्दी दिसते आहे.
पावसाचा तडाखा संपल्यानंतर हवा दमट राहिली असून, वातावरणामुळे अनेकांना घसा खवखवणे, डोळ्यांची जळजळ आणि श्वसनाचे त्रास जाणवत आहेत. खराब रस्त्यांमुळे, रस्त्यांवरील धुळीमुळे आणि वाहनांच्या धुरामुळे हवेची गुणवत्ताही ढासळली आहे, त्यामुळे दम्याचे, इतर श्वसन विकारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. घरात किंवा जवळपासच्या परिसरात कोणालाही याचा त्रास जाणवल्यास वैद्यकीय तज्ज्ञकडून उपचार करून घ्यावेत असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.
अधिकाधिक नागरिकांनी मास्क वापरावा, पिण्याचे पाणी उकळून, गाळून प्यावे. तब्येत बरी नसल्यास शक्यतो घरातच राहावे. खोकताना, शिंकताना नाकातोंडावर रुमाल किंवा हात ठेवावा, धुळीच्या ठिकाणी जाणे टाळावे.