Vasai 15-day-old baby found
वसई : ऐतिहासिक परंपरा जपत, आजच्या अत्याधुनिक काळातही एक सांस्कृतिक शहर म्हणून उदयास आलेल्या वसईत आज सर्वत्र महिला गौरवाचे कार्यक्रम सुरू आहेत. मात्र या जागतिक महिला दिनाला वसईत समोर आलेल्या घटनेने गालबोट लागले आहे. ऐन महिला दिनीच (दि.८) वसईत मातृत्वाचे क्रूर दर्शन घडले. आपल्या निरागस बालिकेला रस्त्यात टाकून आईने पळ काढल्याचे अघटीत समोर आले आहे.
एका मातेने आपल्या १५ दिवसांच्या तान्ह्या बाळाला रस्त्यात टाकून दिल्याची घटना वसईत घडली आहे. प्रभातफेरीसाठी गेलेल्या स्थानिकांना हे बाळ दिसल्यानंतर हा प्रकार समोर आला. बाळ सुखरूप असून याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
८ मार्च हा जागतिक महिला दिवस. संपूर्ण जगभरामध्ये महिलांचा सन्मान करत हा दिवस साजरा करण्यात येतो. मात्र महिलांचे वास्तव जीवन किती खरतर आहे ते दर्शवणारी एक घटना वसईत घडली आहे. रविवारी सकाळी वसई पूर्वेच्या वसंत नगरी येथे स्थानिक नागरिक प्रभात फेरीसाठी गेले होते. त्यांना वसंत नगरी सिग्नल जवळ असलेल्या रस्त्याच्या कोपर्यातून बाळाचा रडण्याचा आवाज आला.
तिकडे जाऊन पाहिले असता एका पिशवाती नवजात बालक आढळून आली. स्थानिकांनी ताबडतोब माणिकपूर पोलिसांना संपर्क केला. बाळाला उपचारासाठी वसईच्या सर डी एम पेटीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे बाळ पुढील प्रक्रियेसाठी उमराळे येथील महिला बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले आहे. स्त्री जातीचे हे बाळ दहा ते पंधरा दिवसांचे आहे. तिची प्रकृती एकदम ठीक आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी अज्ञात महिले विरोधात गुन्हा दाखल केला आहे.