अनेक चाकरमान्यांना पाण्याने भरलेल्या रत्‍यावरुन कामावर जाण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीचा आधार मिळाला  
पालघर

Vasai - Virar News | मुसळधार पावसामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प असताना ट्रॅक्टर-ट्रॉली ठरल्या प्रवाशांसाठी आधार!

रस्ते चिखलमय असल्याने ग्रांउड क्लिअरन्स अधिक असल्याचे ट्रॅकट ट्रॉली सहज पाण्यातून होतात पार! चाकरमान्यांची झाली चांगली सोय!

पुढारी वृत्तसेवा

वसई : वसई विरार शहरात मुसळधार पावसामुळे अनेक प्रमुख रस्त्यांवर 2-2 ते 3-3 फुटाहून अधिक पाणी साचले असून, त्यामुळे गेले चार दिवस सार्वजनिक आणि खासगी अशी जवळपास सर्वच वाहतूक यंत्रणा ठप्प झाली आहे. अशा परिस्थितीत उंचीला अधिक असलेले ट्रॅक्टर आणि ट्रॉली हे वाहन एकमेव वाहतुकीसाठी पर्वणी ठरले आहे.

दररोज सायंकाळी चाकरमानी प्रवाशांना त्यांच्या घरी आणि इच्छित ठिकाणी पोहोचविण्यासाठी काही ट्रॅक्टर आणि ट्रॉली चालकांनी सामाजिक भावनेतून आणि माफक मूल्यात संकटकाळी एकमेव पर्याय असलेली ही सेवा दिल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

वसई रोड येथील ट्रॅक्टर मालकांनी परिसरानुसार गट तयार केले असून, ते प्रत्येक प्रवाशाकडून ५० रुपये भाडे घेत आहेत. ज्या ठिकाणी जाणार आहेत. त्या ठिकाणाचे नाव ओरडून प्रवाशांना एकत्र करून प्रवास सुरू करतात. वसईरोड स्टेशन जवळीक स्कायवॉकखाली ट्रॅक्टर-ट्रॉली चालकांचे गट उभे असून ते प्रवाशांना वसई गांव, वसई पूर्व भागात पोहोचवत आहेत. रिक्षा, राज्य परिवहन (एसटी) आणि व्हीव्हीएमसीच्या बसेस बंद असल्याने अनेक प्रवासी अडकून पडत आहेत. हे ट्रॅक्टर प्रवाशांना गोखीवरेपर्यंत सोडतात. तेथून पुढील मार्गासाठी इतर ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे.

मात्र, या ट्रॅक्टर चालकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाण्यातून जाताना अनेकदा टायर पंक्चर होतात. खोल पाण्यात अन्य तांत्रिक कारणाने ट्रॅक्टर नादुरुस्तही होतात. अश्या जागेवरच टायर बदलण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी त्यांना स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागतो. रेल्वेच्या अनिश्चित आणि अवेळी झालेल्या प्रवासातून आल्यावर पुढची वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसतांना अशा ट्रॅक्टर-ट्रॉली चा पर्याय प्रवाश्याना पर्वणी ठरला आहे. मुसळधार पावसाच्या या संकटात प्रवाशांसाठी मदतीचा हात देणारे ट्रॅक्टर-ट्रॉली चालक सध्या वसई शहरात चर्चेचा विषय ठरले आहेत.

ट्रॅक्टर चालक आनंद घुगे याबाबत म्हणाले, "जसे सामाजिक कार्यकर्ते पाण्यात अडकलेल्या नागरिकांना अन्न आणि पिण्याचे पाणी देत आहेत, तसेच आम्हीही लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही फक्त ठरलेले आणि माफक भाडे घेतो. संकटाच्या काळात प्रवाशांची लूट करत नाही. सेवभावी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही ट्रॅक्टर-ट्रॉलीचा मोठा फायदा होत आहे.
ट्रॅक्टर चालक आनंद घुगे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT