Vasai Fishing Season File Photo
पालघर

Vasai Fishing Season: मासेमारी हंगामासाठी मच्छीमारांची लगबग

बोटींची डागडुजी, जाळी-बर्फ-इंधनासह जीवनावश्यक साहित्याची जमवाजमव

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे: वादळी वारे, समुद्रातील तुफानी परिस्थिती आणि मत्स्यबीज संवर्धनाचा काळ लक्षात घेऊन मागील दोन ते अडीच महिन्यांपासून बंद असलेल्या मासेमारी हंगामाला आता सुरुवात होणार आहे. १५ ऑगस्टपासून मासेमारीचा हंगाम सुरू होत असल्याने वसईच्या समुद्रकिनारी मच्छीमार बांधवांची लगबग वाढली आहे.

बोर्टीची डागडुजी, जाळ्यांची दुरुस्ती, बर्फ, इंधन तसेच खोल समुद्रात महिनाभरासाठी लागणाऱ्या वस्तूंची जमवाजमव अंतिम टप्प्यात आली आहे. अर्नाळा, वसई, नायगाव, पाचूबंदर, किल्लाबंदर परिसरातील मोठ्या संख्येने कोळी बांधव मासेमारीवर अवलंबून आहेत. हंगाम सुरू झाल्यानंतर मच्छीमार बोटी घेऊन समुद्रात जातात. अनेक बोटी समुद्रात महिनाभर मुक्काम करून मासेमारी करतात.

पारंपरिक मच्छीमारांमध्ये नाराजी

महाराष्ट्र शासनाने १५ ऑगस्टपर्यंत मासेमारी बंदी जाहीर केल्याने हजारो पारंपरिक मच्छीमारांनी त्यानुसार आपल्या व्यवसायाचे नियोजन केले होते. मात्र, ऐनवेळी १ ऑगस्टपासून १२ सागरी मैलांच्या पलीकडे मासेमारीला परवानगी देण्यात आल्याने आधीच सज्ज असलेल्या मोठ्या नौकामालकांना १५ दिवसांचा फायदा झाला, असा आरोप मच्छीमारांकडून करण्यात येत आहे.

मत्स्यसंपदेच्या संवर्धनासाठी जाहीर करण्यात आलेल्या बंदीचा आर्थिक फटका पारंपरिक मच्छीमारांनाच बसत असून, बदललेल्या निर्णयामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना आहे

३३० बोटींना परवाने

वसई-विरारच्या समुद्रकिनारी भागात ६०० हून अधिक मासेमारी बोटी आहेत. नव्या नियमांनुसार १२ सागरी मैलांच्या आत आणि १२ सागरी मैलांच्या पलीकडे अशा दोन प्रकारच्या मासेमारी परवान्यांचे वितरण करण्यात येत आहे.

परवाना अधिकारी विनोद लहारे यांच्या माहितीनुसार, या भागात एकूण ६२७ परवानाधारक बोटी असून आतापर्यंत ३३० बोटींना परवाने मंजूर झाले आहेत. उर्वरित बोटींना परवाने देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT