अनिलराज रोकडे
वसई : ख्रिस्ती धर्माचे भारतीयकरण करण्यात मोलाचे योगदान असलेले प्रख्यात वसईकर ख्रिस्ती धर्मगुरू हिलरी फर्नांडिस यांचे भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ८६ वर्ष होते. फादर फर्नांडिस यांनी स्वतःच्या मृत्युपत्रात व्यक्त केलेल्या इच्छेनुसार, त्यांचा ख्रिस्ती परंपरेप्रमाणे चर्चमध्ये दफन विधी न होता, हिंदू संस्कृतीप्रमाणे पाचुंबदर येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. फादर हिलरी यांचे पूर्वनियोजनानुसार आज सायंकाळी चर्चमध्ये दफन होणार होते. परंतु सायंकाळी त्यांच्या मृत्युपत्रातील तपशील समोर आल्याने त्यांनी व्यक्त केलेल्या अंतिम इच्छेमुळे वसईतील ख्रिस्ती वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
ख्रिस्ती उपासनेत क्रांती घडवून आणणारे आणि ख्रिस्ती धर्माच्या मराठीकीकरणात मोलाचा वाटा असणारे ख्रिस्ती धर्मगुरू हिलरी फर्नांडिस यांचे बुधवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल वसई विरारसह विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. गुरुवार, २२ जानेवारी सकाळी त्यांचे पार्थिव उत्तन येथील लेडी ऑफ दि सी चर्च येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. उद्या, दि. 23 रोजी सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत फादर हिलरी यांचे पार्थिव वसई पश्चिमेच्या तरखड येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार असून, सकाळी 10 वसईतील रमेदी चर्चमध्ये त्यांच्यासाठी पवित्र मिसा अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर 11 वाजता महापालिकेच्या पाचुंदर येथील हिंदूंच्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हिलरी फर्नांडिस यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९३८ साली वसईतील तरखड गावात झाला होता. डिसेंबर १९७२ मध्ये त्यांना ख्रिस्ती धर्मगुरूपदाची दीक्षा मिळाली. त्यांनी वसई आणि मुंबई धर्मप्रांतात सेवा कार्य केले आहे. सुरुवातीची अनेक वर्षे ते गिरीज येथील जीवन दर्शन केंद्राचे संचालक होते. सर्वधर्मसमभाव आणि भारतीयकरणाचे पुरस्कर्ते म्हणून त्यांची ख्याती होती.
धर्मगुरू फर्नांडिस यांना साहित्य, संगीत, आणि नाट्य क्षेत्रातही अभिरुची होती. वसईच्या सुवार्ता मासिकातून त्यांनी काव्यलेखनाला सुरुवात केली होती. त्यांच्या या गुणाची योग्य ती नोंद घेऊन सुवार्ताचे तत्कालीन संपादक धर्मगुरू डॉमनिक आब्रिओ यांना साहाय्यक म्हणून १ जून १९७१ रोजी त्यांची कार्यकारी संपादक म्हणून नेमणूक केली होती. वसईच्या सुवार्ता मासिकासह जनपरिवार साप्ताहिकासाठीही त्यांनी लेखन केले.
धर्मगुरू हिलरी फर्नांडीस यांना नाटकाची अतिशय आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी रमेदी धर्मग्रामात 'कलाभारती' नाट्यसंस्था स्थापन करून अनेक युवक युवतींना नाटकाचे धडे. त्यांनी स्वतः नाटके लिहून, स्वतः अभिनय व दिग्दर्शन करून वसईतील नाट्य व्यासपीठ गाजविले. त्यांच्या 'अंधारातून प्रकाशाकडे' या येशूच्या जीवनावरील आधारित नृत्य संगीत नाट्याचे प्रयोग वसई-धारावीसह संपूर्ण महाराष्ट्रभर झाले. ५० नवोदित कलाकारांना घेऊन त्यांनी हे संगीत नृत्यनाट्य सादर केले.
महाराष्ट्रातील ख्रिस्ती धर्माच्या प्रचार प्रसारासाठी मोठे योगदान
यासाठी त्यांनी येशूची भारतीय रूपात त्यांनी प्रतिष्ठापना केली होती. त्यांची शंभराहून अधिक पुस्तके प्रसिद्ध असून संपूर्ण बायबल त्यांनी मराठीत ओवीबद्ध केलं. साहित्यिक नारायण वामन टिळक यांच्याकडून प्रेरणा घेत त्यांनी महाराष्ट्रातील ख्रिस्ती बांधवांसाठी संत काव्यावर आधारित 'नवे गीत गा', 'मला गाऊ दे', 'मारिया भजन माला', 'प्रभू माझा क्रुसधारी', 'हा कोण चालला कालवरी' या गीतसंग्रहांची रचना केली. तसेच गेल्या ५० वर्षांपासून कीर्तनाच्या धरतीवर ते ख्रिस्ती उपासनेचे आयोजन करत आले आहेत. पेटी, तबला, मृदुंग, टाळ या पारंपारिक भारतीय वाद्यांचा वापर त्यांनी उपासनेत सुरू केला. साहित्य, नाट्य आणि संगीताच्या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल वसई मराठी ख्रिस्ती साहित्य मंडळाकडून त्यांना 'गार्डवेल साहित्य पुरस्कारा'ने गौरविण्यात आले होते.
फादर हिलरी फर्नांडिस हे वास्तववादी होते. पण त्यांनी केलेल्या लेखन आणि भाषणातून ते नास्तिक असतील असं अनेकांना वाटायचं. पण नंतर त्या अस्तिकासारखी येशूची उपासना देखील करायचे. त्यामुळे मराठी ख्रिस्ती धर्मात क्रांती घडवून आणणारे फादर हिलरी यांचे व्यक्तिमत्त्व शब्दात मांडणे कठीण आहे.रेमंड मच्याडो, ज्येष्ठ लेखक