Vasai Dumping Ground Pudhari
पालघर

Vasai Dumping Ground: वसई डम्पिंग ग्राउंडचा धूर जीवघेणा; नागरिकांचा संताप उसळला

कचऱ्याच्या ढिगांना लागणाऱ्या आगींमुळे प्रदूषण वाढले; आरोग्यावर गंभीर परिणाम, मोर्चाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

वसई : वसईतील डम्पिंग ग्राउंड चा प्रश्न आता अधिकच जटील होत चालला असून या डम्पिंग प्रकल्पामधून निघणाऱ्या धुरामुळे वसई विरार शहरात प्रदूषणाचे प्रमाण वाढत असून यावर महापालिका स्तरातून कुठलिही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने

नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच वाढत्या उन्हाळ्यात साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाला लागणाऱ्या आगीमुळे नागरिक तसेच मुक्या प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होऊ लागले आहेत. या धुरामुळे भोयदापाडा, वालीव, सातिवली, वाघराळपाडा,राजीवली,मधुबन या भागातील लोकांना अधिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आता ही समस्या अधिकच तीव्र होत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात आरोग्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. या प्रकरणी त्वरित दखल घेऊन उपाययोजना न केल्यास लवकरच गावकरी हजारोच्या संख्येने महानगरपालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचे सांगण्यात आले.

महानगरपालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असून या प्रकल्पातील कचरा वर्गीकरण रखडले असल्याचे संतप्त प्रतिक्रिया अतुल काकासाहेब मोटे यांनी दिली आहे. या डम्पिंग प्रकल्पामुळे या भागातील करदाते नागरिक काय नरक यातना भोगत आहेत याची जाणीव करून देण्यासाठी वसई विरार शहर महापालिकेच्या आयुक्तांचा यांचा बंगला भोयदापाडा गावात बांधण्यात अशी संतप्त प्रतिक्रिया अतुल मोटे यांनी दिली आहे. वसई पूर्वेतील भोयदापाडा येथे वसई विरार महापालिकेची कचराभूमी आहे. विविध प्रभागांसाठी नियुक्त ठेकेदारांमार्फत गोळा करण्यात येणार कचरा या कचराभूमीत आणून टाकला जातो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या भागातील घनकचरा

प्रकल्प बंद असल्यामुळे दिवसेंदिवस कचराभूमीत कचऱ्याचे डोंगर उभे राहू लागले आहेत. या कचऱ्यामधून बाहेर पडणारे दूषित पाणी तसेच कुजणाऱ्या कचऱ्यामुळे स्थानिक आधीच त्रस्त असताना कचऱ्याला लागणाऱ्या आगींमुळे यात भर पडली आहे. शहरातील वाढत्या उष्णतेमुळे कचराभूमीतील कचऱ्याला सतत आगी लागण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. कचऱ्याच्या ढिगाला लागणाऱ्या आगींमुळे दुर्गंधीयुक्त धूर परिसरात पसरून त्याचा त्रास आता होऊ लागला आहे. या त्रासाने रात्रीच्या वेळी अक्षरशा या भागात नागरिकांना दरवाजे खिडकी खुले ठेवणे देखील जिकरीचे झाले आहे. हा धूर इतका घातक आहे लहान मुले तसेच वयोवृद्ध नागरिक यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो आहे. नागरी वस्त्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना डोळे जळजळणे, सर्दी-खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, उलट्या होणे, डोकेदुखी, अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

वसई विरार शहरातील इतर भागांप्रमाणे भोयदापाडा परिसरातही भटक्या गाई आणि म्हशी तसेच श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकदा अन्नाच्या शोधात असणारे हे प्राणी थेट कचराभूमीत शिरून कचऱ्याच्या ढिगातून अन्न शोधण्याचा प्रयत्न करतात. तर कचऱ्याला वारंवार लागणाऱ्या या आगींमध्ये अनेकदा हे प्राणीही अडकून पडतात आणि होरपळून जखमी होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.लवकरच गावकरी हजारोच्या संख्येने महानगरपालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT