Vasai Child beaten
वसई : वसईमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या भांडणाचा राग एका चार वर्षांच्या निष्पाप मुलावर काढला. आरोपीने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडत मुलाला जमिनीवर आपटलं आणि बेदम मारहाण केली.
या अमानुष कृत्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला असून, तो पाहून लोकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. या प्रकरणी रिक्षाचालकाला अटक केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण आहे.
अनुपम हाउसिंग सोसायटीमध्ये राहणारे अतुल कोंढारे आणि त्याच सोसायटीत राहणारा रिक्षाचालक संदीप पवार (५७) यांच्यात काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. आरोपी संदीप पवारने आपला राग थेट त्या व्यक्तीवर नाही, तर त्याच्या लहान मुलावर काढला. सोमवारी सायंकाळी सोसायटीत नेहमीप्रमाणे मुले खेळत होती. त्याच वेळी अतुल कोंढारे यांचा चार वर्षांचा मुलगा विघ्नेश खेळता खेळता एका रिक्षात जाऊन बसला.
त्या निष्पाप जीवाचा कोणताही दोष नसतांना आरोपी संदीप पवार तिथे पोहोचला आणि त्याने तिथे खेळणाऱ्या इतर मुलांना पळवून लावलं. त्यानंतर त्याने एकट्या विघ्नेशला टार्गेट केले. संदीपने प्रथम मुलाला पकडून त्याचे डोके रिक्षाच्या लोखंडी भागावर जोरात आपटले. एवढ्यावरही त्याचा राग शांत झाला नाही. त्याने मुलाचे पाय पकडून त्याला जमिनीवर जोरात आदळले.