वसईच्या समुद्रकिनारी तेल तवंगामुळे किनार्‍याचे झाले विद्रुपीकरण pudhari photo
पालघर

Vasai beach oil spill : वसईच्या समुद्रकिनारी तेल तवंगामुळे किनार्‍याचे झाले विद्रुपीकरण

सागरी प्रदूषणामुळे जलचरांना धोका, नागरी जीवनही धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : वसईचे सागरी किनारे सद्ध्या प्रदूषण ग्रस्त झाले आहेत.पश्चिमेतील नवापूर राजोडी व अर्नाळा या समुद्रकिनार्‍यावर सोमवारी सकाळी तेल तवंगाच्या गुठळ्या दिसून आल्या. यामुळे सागरी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

तिसरी मुंबई म्हणून नावारूपाला येत असलेल्या वसईला अत्यंत मनोहारी व निसर्गरम्य सागरी किनारा लाभला आहे.या किनार्‍यांवर मुंबई ठाण्यातील पर्यटक मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत. मात्र हेच किनारे आता वेगवेगळ्या समस्यांनी ग्रस्त आहेत.याला भरीस भर म्हणजे समुद्रातून वाहून येणारे निसरडे तेलाचे तवंग व गुठळ्या. यामुळे हे आकर्षक किनारे आता प्रदूषणाच्या विळख्यात सापडत आहेत.

सोमवारी वसईतील नवापूर राजोडी व अर्नाळा येथील विविध ठिकाणच्या समुद्र किनार्‍यावर मोठ्या प्रमाणात तेलाचे तवंग व गुठळ्या दिसून आल्या आहेत. समुद्रातील अंतर्गत भागात होणारे जलप्रदूषण मोठ्या जहाजांमधून गळती होणारे तेल तवंग किनार्‍यावर लागले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून मागील काही वर्षात अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे.

मोठ्या जहाजांचे होणारे अपघात, आयात निर्यात करताना तेलाचे पडणारे कंटेनर्स यास कारणीभूत असल्याचेही सांगण्यात येत आहे. आधीच सागरी प्रदूषणामुळे मत्स्यजीव मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहेत. त्यातच तेलाच्या प्रदूषणामुळे होणारी हानी टाळण्यासाठी सरकारमार्फत कुठलेही प्रयत्न केले जात नाहीत.

समुद्रकिनार्‍यावर आलेल्या या तेल तवंगांची साफसफाई करण्यासाठी येथील प्रशासन उदासिन दिसून येत आहे. त्यामुळे सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्ते आपल्या श्रमदानातून येथील समुद्रकिनारा स्वच्छ करीत असल्याची माहिती येथील जीव रक्षक जनार्दन मेहेर यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT