Vandri Dam Water Release Pudhari
पालघर

Vandri Dam Water Release: वांद्री धरणातील पाणी नदीत सोडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जॅकवेल दुरुस्तीसाठी पाणीस्तर कमी; नदीपात्रात पातळी वाढल्याने नागरिकांना खबरदारीच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

पालघर : वांद्री धरणाच्या जॅकवेल मधील पाणी गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आहे. दुरुस्तीच्या कामासाठी धरणाचे पाणी वांद्री नदीत सोडून धरणातील पाणीसाठा कमी केला जात आहे. धरणाच्या पाण्यामुळे नदी पात्रात पाणी पातळी वाढल्याने वांद्री नदी काठच्या गावांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नदी पात्र ओलांडणे, पोहणे, अंघोळ आणि कपडे धुण्यासाठी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. वांद्री नदी काठच्या ग्रामपंचायतींना पत्र देऊन जनजागृती करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

पाटबंधारे विभागाच्या वांद्री धरणाच्या मुख्य विमोचक विहिरीत पडझड झाल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पाण्याची गळती सुरु झाली होती. विहिरीतील गळतीमुळे धरणाचे पाणी मोठया प्रमाणात वाया जात होते. पाणी गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून विहिरीतून होणरी पाणी गळती रोखण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. विहिरीच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी धरणातील पाण्याची पातळी कमी करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती.दुरुस्तीचे काम सुरु करण्यासाठी धरणातील पाणी विमोचक विहिरीचे दरवाजे उघडून वांद्री नदीमध्ये पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.धरणातील पाणी नदीत सोडल्यामुळे नदीतील पाण्याचा प्रवाहात वाढ होऊन पाणी पातळी वाढणार आहे.धरणातील पाण्यामुळे नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने वांद्री नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.

वांद्री नदी ओलांडताना तसेच कपडे धुणे तसेच मासेमारी करताना अपघात होऊन जीवित हानी होऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाकडून वांद्री नदी काठच्या ग्रामपंचायतींना खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वांद्री नदी काठच्या नागरिकांनी नदीत मासेमारी,पोहणे, अंघोळ तसेच कपडे धुणे आदी कामांसाठी नदीत पात्रात जाऊ नये तसेच वांद्री नदी परीसरात सावधगिरीने वावरण्यासाठी नागरिकांना सुचित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायत स्तरावरून दवंडी तसेच समाज माध्यमातून ग्रामस्थांना माहिती देण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने नदी काठच्या ढेकाळे,जानसई,सातीवली, हालोली, दहिसर तर्फे मनोर, साखरे, नावझे, गिराळे आणि पारगाव ग्रामपंचायतींना केले आहे.

गेल्या वर्षी धरणाच्या जॅकवेलच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती,पावसाळा सुरु होण्यापुर्वी दुरुस्तीचे काम अपूर्ण राहिले होते.दुरुस्तीचे उर्वरित काम पूर्ण करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे.नुकताच धरणातील पाणी वांद्री नदीत सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT