वांद्री धरण, ठाकूर पाड्याचा धबधबा ठरतोय आकर्षणाचे केंद्र pudhari photo
पालघर

Palghar News : वांद्री धरण, ठाकूर पाड्याचा धबधबा ठरतोय आकर्षणाचे केंद्र

मुंबई,ठाणे,वसई विरार, पालघर जिल्ह्यातील पर्यटकांची होतेय गर्दी

पुढारी वृत्तसेवा

पालघर ः पावसाळ्यात हिरवाईने नटलेल्या निसर्गात रमण्याचा आनंद वेगळाच असतो. मुक्तहस्ताने केलेली हिरव्या रंगाची उधळण आणि फेसाळणार्‍या धबधब्यांवर चिंब भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले पालघर तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या बहिरीफोंडा जायशेत सारख्या दुर्गम भागाकडे वळत आहेत.

पालघर तालुक्यातील गांजे ढेकाळे ग्रामपंचायत हद्दीतील वांद्री धरण आणि जायशेत- बहिरीफोंडा ग्रामपंचायत हद्दीतील ठाकूर पाड्याच्या ओहोळावरील धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.वांद्री धरण आणि फेसळणारा ठाकूर पाडा धबधबा,धरण परिसर आणि जायशेत रस्त्यावरील हिरवाईकडे पर्यटक मोठया संखेने आकर्षित होत आहेत. वांद्री धरणाच्या सांडव्यासह ठाकूर पाडा धबधब्याच्या फेसळणार्‍या पाण्यात चिंब भिजण्यासाठी घेण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडत आहे.

मान्सुन बरसण्यास सुरुवात झाल्यापासून प्रत्येक आठवडयाच्या अखेरीस येणारा शनिवार आणि रविवारी पर्यटकांच्या वाहनांच्या रांगा वांद्री धरण आणि ठाकुरपाड्यातील धबधबा परिसरात लागत आहेत.

पालघर तालुक्याच्या पूर्व भागात मुंबई अहमदाबाद महामार्गालगत गांजे ढेकाळे ग्रामपंचायत हद्दीत नैसर्गिक विविधतेने नटलेल्या परिसरात वांद्री धरण आहे. गांजे गावाच्या पूर्वेला वांद्री नदीवर धरण आणि धरण पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. धरणाच्या बुडीत क्षेत्राच्या दक्षिण बाजूकडून दुर्गम भाग असलेल्या जायशेत-बहिरीफोंडा ग्रामपंचायत हद्दीतील ठाकुरपाडया कडे जाणार्‍या रस्त्यालगतची हिरवाईने नटलेला निसर्ग आणि डोंगरातील नाल्यांवर वाहणारे पांढरे शुभ्र झरे पर्यटकांना भुरळ घालत आहेत.

ठाकूर पाडयाचा ओहोळ आणि ओहोळा वरील धबधबा पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असल्याने धबधब्याच्या फेसळणार्‍या पाण्यात भिजण्यासाठी पर्यटक गर्दी करीत आहेत. पावसाळ्याच्या काळातील जून महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यात पर्यंत ठाकूरपाड्याचा धबधबा ओसंडून वाहत असतो.पावसाळ्यात हिरवाईने नटलेला डोंगर, फेसळणारे झरे आणि मन प्रसन्न करणारे वातावरण आणि जंगलात उगवणारा रान मेवा आणि वांद्री धरणातील कोळंबी,कटला आणि रावस सारखे मासे तर ओहोळात मिळणार्‍या चिंबोर्‍या (खेकडे)खवय्यांसाठी मेजवानी ठरत आहेत.

काय पाहाल ?

वांद्री धरण, धरणाचा सांडवा (ओव्हरफलो), जायशेत बहिरीफोंडा रस्त्यावरील निसर्गसौंदर्य, डोंगर उतारावरून धरणाच्या दिशेने वाहणारे पाण्याचे झरे,ठाकुर पाडा धबधबा आणि स्थानिक आदिवासी संस्कृती.

कसे पोहोचाल ?

पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्टेशनवरून मुंबई अहमदाबाद महामार्गाकडे जाण्यासाठी बस आणि खाजगी वाहनांची उपलब्ध सुविधा आहे. महामार्गावरील वरई फाट्यावरून रिक्षाने धरणाकडे जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध असतात.ठाणे आणि मुंबई शहरातील पर्यटक मुंबई अहमदाबाद महामार्गावरून गुजरातच्या दिशेने खनिवडे टोल नाक्या पासून दहा किलोमीटर अंतरावर ढेकाळे गावच्या उड्डाणपूलाखालून उजवीकडे वळाल्यानंतर तीन किलोमीटर अंतरावर वांद्री धरण परिसरात पोहोचता येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT