खानिवडे: समुद्रातील मासेमारीवर बंदी असताना वसईच्या ग्रामीण भागात पावसाळ्याने एक वेगळीच पर्वणी आणली आहे. तुडुंब भरून वाहणाऱ्या नदी-नाले आणि ओहळांतून वळगणी अर्थात चढणीचे मासे मोठ्या प्रमाणात मिळू लागल्याने मासळी बाजार पुन्हा गजबजले आहेत.
पहाटे पकडलेले हे मासे काही तासांतच बाजारात पोहोचत असल्याने त्यांचा ताजेपणा आणि चव यामुळे खवय्यांकडून मोठी पसंती मिळत आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर नद्या आणि ओहळांना भरपूर पाणी आले आहे. याच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चढणारे गोड्या पाण्यातील मासे स्थानिक भाषेत वळगणी, चिवणी किंवा चढणीचे मासे म्हणून ओळखले जातात. सध्या हे मासे मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने बाजारात त्यांची चांगली आवक झाली आहे.
दरवर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत मत्स्य प्रजननासाठी समुद्रातील मासेमारीवर शासनाकडून बंदी असते. त्यामुळे समुद्री मासळीची आवक घटली असून ग्राहकांचा ओढा आता खाडी, नदी आणि ओहळांतून मिळणाऱ्या ताज्या माशांकडे वाढला आहे.
वसईतील गाव-पाड्यांमध्ये पहाटेपासूनच मासेमारीची लगबग सुरू होते. पुरुष आणि महिला पाग, झोळणे, लाकडी तोंड्या, भुसा आणि पारंपरिक गळ यांच्या साहाय्याने मासे पकडत आहेत. ही मासळी स्थानिक बाजारपेठेत तसेच घरोघरी विक्रीसाठी नेली जात असल्याने अनेक कुटुंबांना पावसाळ्यातील हंगामी रोजगाराचा आधार मिळत आहे.
गाभोळी भरलेले चिवणीचे मासे त्यांच्या रुचकर चवीमुळे विशेष लोकप्रिय आहेत. बाजारात चिवणीच्या एका वाट्याला २०० ते ५०० रुपये दर मिळत असून, ताज्या वळगणीच्या माशांनी सध्या वसईच्या मासळी बाजारात चांगलीच रंगत आणली आहे.