मोखाडा : मोखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैतरणा धरणाजवळ 12 जुलै रोजी एक मृतदेह जंगली वेलींनी बांधलेल्या अवस्थेत आढळला होता.या गुन्ह्याच्या सखोल तपासाला यश आले असून जमीनीच्या वादातून तसेच पुर्वमैनस्यातून चार ते पाच जणांनी मिळून एकाची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.शरद बोडके (31) असे मृत व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. संतोष धात्रक (36) शिवराम वाघ ( 29) गोकुळ बेंडकोळी ( 29) गणेश बेंडकोळी वय( 22)आणि संजय पोटकुले वय( 23)अशी अटक आरोपींची नावे असून सर्वजण इगतपुरी तालुक्यातील आहेत.
जुलै महिन्यात घडलेल्या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊ पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी तपास पथके तयार करून तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर मयताच्या गावी जाऊन चौकशी करून तांत्रिक तपासाच्या साह्याने कौशल्यपूर्ण तपास केला.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की यातील आरोपी संतोष उर्फ अरुण धात्रक याला वेळोवेळी जमिनीच्या वादावरून मृत हा दादागिरी करायचा तसेच मृत शरद बोडके यांनी पुर्वी झालेल्या भांडणात आरोपी संतोष धात्रक याच्या आई-वडिलांना सुद्धा मारहाण केली होती तर त्याच्या मामाचा पाय मोडून टाकला होता. त्याचा राग मनात धरून आरोपी याने संगणमत करून मयत शरद यास दारू पाजाण्याच्या निमित्ताने त्याच्या कार मधून जांभूळपाडा ता. त्र्यंबकेश्वर येथे निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जाऊन जंगली वेलीने त्याचे पाय बांधून मोखाडा पोलीस ठाणे हद्दीत वैतरणा धरणाच्या पुलाजवळ पाण्यात टाकून निघून गेले असल्याचे या तपासात निष्पन्न झाले आहे. वरील पाचही आरोपींना अटक करून पुढील गुन्ह्याचा तपास मोकळा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे उपविभागीय पोलीस अधिकारी जवाहर भरत मेहेर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस शिक्षक प्रेमनाथ ढोले सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे,पोलीस उपनिरीक्षक वानखडे, आदींच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.