कासा ः पालघर जिल्ह्यातील वाढवण या महाकाय बंदर प्रकल्प उभारणीला मोठा वेग मिळत आहे. या बंदराला अनेक अंतर्गत महामार्ग जोडणार्या ग्रीनफिल्ड महामार्ग निर्मितीची प्रक्रिया सुरु झाली आहे. तवा ( डहाणू) येथील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गापासून वाढवण बंदरापर्यंत तब्बल 32 किलोमीटर लांबीचा आठ पदरी महामार्ग तयार होणार आहे. या महामार्गामुळे तवा, कोल्हाण, धामटणे, आंबेदे, नानिवली, आकेगव्हाण, आकोली, रावते, चिंचारे, गारगाव, शिरगांव आदी गावांतील हजारो शेतकर्यांची जमीन संपादित केली जाणार आहे.
मात्र भुसंपादन प्रक्रियेमध्ये शेतकर्यांना विश्वासात न घेता महसूल विभागाकडून जबरदस्तीने जमिनीची मोजणी केली जात असल्याचा गंभीर आरोप शेतकर्यांनी केला आहे. शेतकर्यांच्या सातबार्यात महसूल विभागाने कोणतीही लेखी नोटीस न देता फेरफार केल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे. त्यातच फळझाडे, औषधी व वनझाडे, तलाव, बोरवेल, तसेच पक्की व कच्ची घरे यांची कोणतीही योग्य नोंद न घेता भुसंपादनाची प्रक्रिया रेटली जात आहे.
यासंदर्भात बाधित शेतकर्यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्यांना लेखी तक्रार सादर केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. मात्र या बैठकीस जिल्हाधिकारी स्वतः गैरहजर राहिल्याने फक्त निवासी जिल्हाधिकारी उपस्थित होते. परिणामी शेतकर्यांच्या मागण्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, असा आरोप शेतकर्यांनी केला आहे.
शेतकर्यांचा आरोप आहे की, प्रकल्पाच्या नावाखाली जबरदस्तीने जमीन हिसकावून घेतली जात आहे. “आम्हाला मोबदला, कायमस्वरूपी रोजगार आणि प्रकल्प बाधित दर्जा मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.यामुळे आगामी काळात वाढवण बंदर प्रकल्प व ग्रीनफिल्ड महामार्ग कामावर शेतकर्यांचा आक्रोश व संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
शेतकर्यांच्या प्रमुख मागण्या
भुसंपादित जमिनीबाबत प्रति गुंठा किमान 20 लाख रुपयांचा मोबदला द्यावा,तवा ते वाढवण पर्यंतच्या सर्व जमिनींना एकसमान दराने मोबदला मिळावा, फळझाडे, वनझाडे, औषधी वनस्पती यांचा कृषी विभाग व वनविभागामार्फत स्वतंत्र सर्व्हे करून मोबदला ठरवावा, प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांना वाढवण बंदरात कायमस्वरूपी नोकरी मिळावी, बाधित शेतकर्यांना प्रकल्प बाधित प्रमाणपत्र देण्यात यावे, महामार्ग नियोजन करताना नदी-नाले यांसारख्या नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांना बाधा होऊ नये.