खानिवडे : वसई तहसीलदार कार्यालयामध्ये कर्मचारी पदे रिक्त असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे विहित मुदतीत नागरिकांची कामे होत नसल्याने त्याचा प्रत्यक्ष फायदा हा मध्यस्थ व्यक्तीस होत असल्याचे दिसून येत आहे. नियोजित आकृतीबंधा प्रमाणे रिक्त असलेली ही पदे भरण्यासाठी तहसीलदार वसई यांच्यामार्फत जिल्हाधिकारी पालघर यांना कळवण्यात आले, परंतु त्यानंतरही पदभरणा खोळंबलेला आहे.
वसई तहसीलदार कार्यालयामध्ये सध्या १४४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ६९ पदे ही भरलेली आहेत. उर्वरित एकूण ७५ पदांसाठी कर्मचारी वर्ग उपलब्ध नाही. सध्या या कार्यालयाच्या प्रत्येक विभागाचा कारभार खाजगी कर्मचारी सांभाळत आहेत. हे खाजगी कर्मचारी जवळपास ६० ते ७० आहेत. या कर्मचाऱ्यांना त्यांचे मासिक वेतन कोण देतं? हा संशोधनाचा विषय आहे.
नागरिकांना विविध दाखले व अन्य कामाकरता येथील सतत खेट्या माराव्या लागत असून त्यांची मोठी गैरसोय होत आहे. नायब तहसीलदार पदासाठी चार पदे मंजूर असताना दोन पदे रिक्त आहेत. महसूल सहाय्यक पदासाठी १९ पदे असताना त्यातील नऊ पदे रिक्त आहेत. एक मंडळ अधिकारी, २८ तलाठी, ३२ कोतवाल, एक वाहन चालक, एक अव्वल कारकून अशी विविध पदे मागील काही वर्षांपासून भरण्यात आलेली नाहीत. परिणामी त्याचा अतिरिक्त भार येथील कर्मचाऱ्यांवर येतो.
विहित मुदतीत कामे न होणे, अप्रशिक्षित कर्मचारी असल्याने दस्तऐवज गहाळ होणे, अनेक महिने टपाल साचून राहणे, प्रकरणांच्या आवश्यक सुनावण्या न होणे इत्यादी समस्या निर्माण झालेल्या आहेत. कर्मचारी वर्ग कितीही कमी असला तरीही सेवा देण्यात येईल असे येथील अधिकारी वर्ग सांगतात परंतु, त्या कामाचा दर्जा कसा असेल शिवाय वेळेत कामे होतील का? याची खात्री कोण देणार असा नागरिकांचा सवाल आहे. त्यामुळे संबधीत रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावी अशी मागणी होत आहे. याबाबत वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांना विचारणा केली असता, दोन कर्मचारी उपलब्ध असतील तरीही नागरिकांना सेवा दिली जाईल. कर्मचारी पुरवठा करण्यासाठी वरिष्ठांना पत्र देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.