Vasai Virar Water Pipeline Burst pudhari photo
पालघर

Vasai Virar Water Pipeline Burst : ट्रकच्या धडकेत जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया

वसईतील पाणीपुरवठ्यावर परिणाम

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : वसई-विरार महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला अवजड ट्रकची धडक बसल्याने ती फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. ही घटना शुक्रवारी पहाटे वसई पूर्वेतील बावखळ गावाजवळ, महामार्गालगत घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात सुमारे २० ते २५ फूट उंच पाण्याचा प्रचंड फवारा उडत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने संबंधित जलवाहिनीचा पुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र, दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत वसईतील काही भागात कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होणार असून, काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.

महत्त्वाचे म्हणजे, बावखळ परिसरात महामार्गालगत असलेल्या याच जलवाहिनीला चालू वर्षात दुसऱ्यांदा ट्रकची धडक बसून ती फुटल्याची घटना घडली आहे. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांमुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असून नागरिकांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या जलवाहिनीच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT