आदिवासी विकास महामंडळा मार्फत आधारभूत भात खरेदी केंद्रांद्वारे शेतकऱ्यांचे भात खरेदी केले जाते ज्यामुळे शेतकऱ्यांना हमी भाव मिळतोच शिवाय त्यांची व्यापाऱ्यांमार्फत होणारी पिळवणूक देखील रोखता येते. डिसेंबर संपायला आला असून बहुतांश शेतकऱ्यांच्या भाताची झोडणी देखील आटोपली परंतु अजूनही भाताची प्रत्यक्ष खरेदीला सुरूवात झाली नसून शेतकरी आस लावून बसला आहे.
वाडा तालुक्यात मानिवली, परळी, गो-हे, खैरे-आंबिवली, गुहिर, पोशेरी, कोनसई व सारशी अशा आठ ठिकाणी आधारभूत खरेदी केंद्र असून यात अंदाजे ७ हजार शेतकऱ्यांचे जवळपास अडीच लाख क्विंटल भात खरेदी केले जाते. मागील वर्षी प्रती क्विंटल २१८३ इतका भाव होता मात्र यावर्षी तो वाढवून २३०० प्रती क्विटल इतका करण्यात आला आहे. आठही केंद्रांवर आतापर्यंत केवळ १४६५ शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून अजूनही हजारो शेतकरी या प्रक्रियेत आहेत.
डिसेंबर अखेरीस रब्बी हंगामदेखील संपला असून प्रत्यक्ष भात खरेदीला अजूनही विलंब होत असल्याने अनेक शेतकरी चिंतेत आहेत. नाईलाजाने शेतकऱ्यावर अल्प दरात खाजगी दलालांना भात विक्री करण्याची वेळ आली असून आधारभूत केंद्रांवरचं हे भात अधिकृत पद्धतीने विकणाऱ्या व्यापाऱ्यांच्या टोळ्याही सक्रिय होत आहेत.
आठ दिवसांत भात खरेदीला सुरूवात होइल असा विश्वास उप प्रादेशिक व्यवस्थापक राजेश पवार यांनी व्यक्त केला असून ३१ मार्च पर्यंत तालुक्यातील कुठल्याही केंद्रावर नोंदणीकृत शेतकऱ्याला आपल्या धान्याची विक्री करता येईल असे सांगितले.