वाडा : मनोर-वाडा-भिवंडी महामार्गाची अवस्था इतकी भीषण आहे की या मार्गावर प्रवास करणे म्हणजे साक्षात नरकयातना भोगण्यासारखे आहे. रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी कोट्यवधींचा निधी मंजुर करूनही कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे हे काम रखडले असून भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे आक्रमक झाले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांना निवेदन सादर करून रस्त्याला गती मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मनोर ते वाडा व पुढे भिवंडी या जवळपास ६४ किमी अंतराची अवस्था दयनीय असून १२ वर्षांपासून लोकांना खड्डेमय रस्त्याचा सामना करावा लागतं आहे. शेकडो अपघात होऊन या महामार्गाने कित्येकांचा बळी घेत असंख्य जण जखमी केले आहेत. पैशांचा अक्षरशः पाऊस या महामार्गाच्या दुरुस्तीनावे कंत्राटदारांनी घशात घातला असून इतके करूनही महामार्गाची अवस्था अतिशय संतापजनक आहे.
आमदार शांताराम मोरे यांनी रस्त्याच्या कामाला गती मिळावी यासाठी पावले उचलली असून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना निवेदन सादर. केले आहे. पावसाळ्याच्या पूर्वी किमान रस्त्याची एक बाजू वाहनांसाठी खुली करता येइल असे नियोजन करावे अशी मागणी मोरे यांनी केली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांकडून देखील मोठा विरोध दर्शविला जात असून बांधकाम विभागाने तातडीने याबाबत गंभीर भूमिका घ्यावी अन्यथा आक्रमक भूमिका घ्यावी लागेल असा इशारा जितेश (बंटी) पाटील यांसह संदीप गणोरे यांनी दिला आहे.