The bridge over the Deharje River has become dangerous.
विक्रमगड : पुढारी वृत्तसेवा
विक्रमगड तालुक्यातील शिळ-देहर्जे गावादरम्यान असलेला देहजें नदिवरील पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायकच बनला असून मोठ्या अपघाताला निमंत्रण देत आहे. एखादा अपघात घडल्यास प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्न येथून प्रवास करणारे ग्रामस्थ विचारत आहेत.
विक्रमगड तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा आणि ग्रामीण भागातील महत्वाचा असणारा शिळ - देहर्जे गावादरम्यान देहर्जे नदीवर असणाऱ्या पुलाची उंची कमी असल्या कारणाने मोठ्या पावसात या पुलावरून पाणी जात असल्याने अनेक दिवस हा रस्ता बंद असतो. त्यामूळे अनेक गावांमधील नागरीकांना फेऱ्याने प्रवास करावा लागतो. त्यातच सध्या या पुलाची दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी हा पुल दबला आहे. मागील अनेक वर्ष नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्याचा मार खाऊन हा पूल कमकुवत बनला असून भविष्यात हा पुल कधीही पुराच्या पाण्यात वाहून जाऊ शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे.
खासदार डॉ. हेमंत सवरा आणि आमदार हरिश्चंद्र भोये या लोकप्रतिनिधींनी या पुलाकडे गांभीयनि लक्ष देऊन उंची असलेला नविन पुल मंजूर करून बांधून द्यावा अशी मागणी शिळ, देहर्जे आणि आजूबाजूच्या गावपाड्यातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
देहर्जे नदीवरील पुल अत्यंत धोकादायक बनला असून कधीही कोसळून पडू शकतो अशी अवस्था या पुलाची झाली आहे. एखादा मोठा अपघात होण्याआधी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन येथे नविन पुल बांधावा. नाहीतर या पुलासाठी आम्हाला आंदोलन करावे लागेल.अभिषेक जाधव, शिवसेना (उबाठा) युवा नेते.
पावसाळ्यात पुराच्या पाण्यात पूल बंद असल्याने आम्हाला वाडा किंवा ठाण्याकडे जाण्यासाठी वळसा घालून जावे लागते. नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन देहर्जे नदीवर योग्य उंचीचा पूल बांधून द्यावा.विपुल पाटील, सामाजिक कार्यकर्ते.