Palghar Tansa River Overflow
खानिवडे : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शुक्रवारी (दि.३) वसई परिसरात आणखी जोर धरला. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नद्या, रस्ते आणि शेतीवर त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे.
वसई पूर्वेतून वाहणाऱ्या तानसा आणि वैतरणा नद्यांनी दुथडी भरून वाहण्यास सुरुवात केली असून यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. नदीपात्रातून वेगाने वाहणाऱ्या पाण्याचा रौद्र अवतार पाहायला मिळत असून तानसा नदीचा प्रवाह अनेक ठिकाणी किनारा ओलांडून वाहू लागला आहे.
दरम्यान, कमी उंचीचा पांढरतारा पूल यंदाच्या हंगामात प्रथमच पाण्याखाली गेल्याने नवसई, भाताणे, थळ्याचापाडा आदी गावांचा वज्रेश्वरी मार्गावरील थेट संपर्क काही काळासाठी खंडित झाला. मात्र आडणे आणि भालीवलीमार्गे पर्यायी मार्ग उपलब्ध असल्याने नागरिकांना वळसा घालून प्रवास करावा लागत असला तरी वाहतूक सुरू आहे.
सततच्या पावसाचा सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे. पावसाच्या सुरुवातीलाच करण्यात आलेल्या भात पेरण्या अनेक ठिकाणी वाहून गेल्या आहेत, तर काही ठिकाणी उगवलेली रोपे विरळ आणि कमकुवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाऊस उघडल्यानंतर अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता असून खरीप हंगामाचे नियोजनही विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याशिवाय, वसई पूर्वेतील सखल भागांतील अनेक अंतर्गत रस्ते आणि शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. काही ठिकाणी झोपड्यांना पाण्याचा वेढा पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे दैनंदिन जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.