मनोर ः खैराच्या ओंडक्यांची वाहतूक करणारा टेम्पो खैरे गावाच्या हद्दीतील काँक्रीटच्या रस्त्यावरील मळीमुळे घसरून रस्त्यालगत उलटल्याने वनविभागाच्या कर्मचार्यांच्या हाती लागला. उलटलेल्या टेम्पोतुन 99 खैराचे सोलीव ओंडके जप्त करण्यात आले आहेत.जप्त केलेले खैराचे ओंडके पालघर तालुक्याचा दुर्गम भाग बहिरीफोंडा -जायशेत भागातुन वांद्री धरणाच्या जलाशयातुन तराफ्याच्या साहाय्याने सुलशेत गावाच्या हद्दीत आणण्यात आले होते.याप्रकरणी दहिसर वन परीक्षेत्र कार्यालयात अज्ञात आरोपी विरोधात वनगुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दहिसर तर्फे मनोर वनपरीक्षेत्राच्या हद्दीतील खैरे गावाच्या हद्दीतील काँक्रीटच्या रस्त्यावरील मळीमुळे शनिवारी पहाटे खैराचे ओंडके वाहतूक करणारा टेम्पो उलटला होता.टेम्पो उलटल्याने खैर तस्करांनी टेम्पो जाग्यावर सोडून घटनास्थळा वरून पळ काढला होता. उलटलेल्या टेम्पोची माहिती मिळाल्या नंतर सकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास भाताणे आणि दहिसर वन परीक्षेत्राचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले होते.कर्मचार्यांनी टेम्पोची तपासणी केली असता टेम्पो मध्ये 99 खैराचे ओंडके आढळून आले.टेम्पो आणि खैराचे ओंडके जप्त करण्यात आले. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात दहिसर तर्फे मनोर वनपरीक्षेत्र कार्यालयात वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचार्यांना खैर तस्करी रोखण्यात अपयश येत असल्यामुळे बहिरी फोंडा जायशेत भागातून खैर तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या वीस दिवसांच्या कालावधीत बहिरी फोंडा जायशेत भागातून खैर तस्करीचा चौथा प्रयत्न उघडकीस आला आहे. वनविभागाच्या डहाणू उपविभाग त्यांच्या कार्यक्षेत्रातील मौल्यवान खैराच्या झाडांची कत्तल आणि तस्करी रोखण्यात अपयशी ठरत आहे.
खैर तस्करीसाठी वांद्री धरणाच्या जलाशयाचा वापर
तस्करीच्या उद्देशाने खैराच्या झाडांची कत्तल करून तयार केलेले ओंडके वांद्री धरणाच्या जलाशयातुन तराफ्याच्या साहाय्याने धरणाच्या ईशान्य दिशेकडील सुलशेत गावाच्या हद्दीत आणण्यात आले होते.सुलशेतच्या हद्दीतील स्मशानभूमी परिसरात ठेवलेले ओंडके टेम्पो मध्ये भरण्यात आले होते.सुलशेत येथून ओंडके भरून निघालेला टेम्पो खैरे गावाच्या हद्दीतील उतारावर घसरून रस्त्यालगत उलटला होता.टेम्पो उलटल्याने टेम्पो सोडून तस्करांनी घटनास्थळा वरून पळ काढला होता.
खैर तस्करीच्या घटना
20 जुलै मोरीच्या सिमेंट पाईपमध्ये आढळले खैराचे ओंडके
29 जुलै रस्त्यालगत झूडपांमध्ये आढळले खैराचे ओंडके
03 ऑगस्ट खैराचे ओंडके वाहतूक करणारी इको कार जप्त
26 जुलै नांदगाव तर्फे मनोरच्या हद्दीत आढळले खैराचे ओंडके
09 ऑगस्टखैरे गावाच्या हद्दीत उलटलेला टेम्पोतील ओंडके जप्त