बोईसर (पालघर) : तारापूर औद्योगिक क्षेत्र प्रदूषणाच्या जाळ्यात अडकले असून, अनेक उद्योगांकडून होणाऱ्या वायू प्रदूषणाने नागरिकांचा श्वास गुदमरू लागला आहे. प्रशासन आणि आरटीओ विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. परिसरात दररोज ट्रेलर आणि कंटेनरद्वारे प्रचंड वाहतूक केली जाते. या वाहनांमधून निघणाऱ्या काळ्या धुरामुळे वातावरण धुक्याने व्यापल्यासारखे होत असून, हवेतील प्रदूषण इतके वाढले आहे की रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना डोळ्यांत जळजळ, श्वासोच्छवासास त्रास अशा समस्या भेडसावत आहेत.
नागरिकांच्या मते, या वाहनांमधून केवळ धुराचे प्रदूषणच होत नाही, तर वाहतुकीदरम्यान ओव्हरलोड माल वाहून वाहतूक नियमांचीही पायमल्ली केली जात आहे. अनेक ट्रेलरमध्ये वजन मयदिपेक्षा दुप्पट माल भरला जातो, ज्यामुळे रस्त्यांची दुरवस्था होते आणि अपघाताचा धोका वाढतो. तरीही आरटीओ विभागाकडून एकही ठोस कारवाई केली जात नाही.
तारापूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीचे तब्बल नऊ प्लांट सुरू आहेत. या प्लांटमधून दररोज शेकडो ट्रेलर बाहेर पडतात आणि याच वाहनांकडून होणारे प्रदूषण सर्वाधिक असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. धूर आणि धुळीच्या या विषारी वातावरणामुळे नागरिकांना त्रास होत असून, परिसरात रोगराई वाढत आहे. यावर नियंत्रण ठेवण्याऐवजी संबंधित अधिकारी हातावर हात धरून बसल्याचे चित्र आहे. काही स्थानिकांच्या मते, संबधीताच्या संगनमतामुळे कारवाई थांबली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वारंवार सूचना देण्यात आल्या असल्या तरी त्या फक्त कागदावरच दिसतात.
वायू, ध्वनी आणि वाहन प्रदूषणाचे सर्व नियम उद्योगांकडून उघडपणे धाब्यावर बसवले जात आहेत. बोईसर, तारापूर परिसरात एवढ्या वर्षांपासून सुरू असलेला औद्योगिक कंपन्या व वाहतूक प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत आहे. तारापूर परिसरातील पर्यावरण वाचवण्यासाठी प्रशासनाने आता तरी जागे होणे अत्यावश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
आंदोलनाचा इशारा
परिसरातील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आरटीओ विभाग आणि प्रदूषण मंडळाने तात्काळ कारवाई केली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.