Tarapur MIDC : तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात धातू गळती pudhari news network
पालघर

Tarapur MIDC : तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात धातू गळती

भीषण अपघातात तीन कामगार भाजले, एक गंभीर जरवमी

पुढारी वृत्तसेवा

बोईसर ( पालघर ) : तारापूर एमआयडीसीतील प्रसिद्ध लोखंड निर्मिती कारखान्यात ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास भट्टीतील गरम धातू गळती होऊन तीन कामगार भाजल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात एका कामगाराची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कारखान्यातील उच्च तापमानाच्या भट्टीत लोखंड वितळवण्याचे काम सुरू असताना अचानक भट्टीचा एक भाग फुटला आणि वितळलेले गरम धातू बाहेर पडले. यामुळे जवळ काम करणारे वीरेंद्र (५०), शिवम कुमार आणि आणखी एक कामगार हे तिघेही गंभीर भाजले. वीरेंद्र यांचे दोन्ही हात आणि पाय सुमारे ३५ टक्के तर शिवम कुमार यांचे हात आणि पाय सुमारे ५ टक्के भाजल्याची माहिती समोर आली आहे. तिसऱ्या कामगाराची ओळख अद्याप निश्चित झालेली नाही.

या अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने बोईसर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर वीरेंद्र आणि शिवम कुमार या दोघांनाही पुढील उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची स्थिती नियंत्रणात असली तरी वीरेंद्र यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विराज प्रोफाइल कारखान्यात यापूर्वीही अशा प्रकारचे अपघात घडले असल्याचे कामगारांनी सांगितले. त्यांनी सुरक्षा साधनांचा अभाव, यंत्रसामग्रीची योग्य देखभाल न होणे आणि देखरेखीतील त्रुटी हेच अपघातांचे मुख्य कारण असल्याचा आरोप केला आहे. या अपघाताची माहिती बोईसर पोलिसांना देण्यात आली असून त्यांनी तपास सुरू केला आहे. मात्र, औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालयाला कंपनीकडून या घटनेची अधिकृत माहिती दिली नसल्याचे समजते. त्यामुळे व्यवस्थापनाने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू आहे. इतक्या मोठ्या घटनेनंतर ही प्रशासनातील अधिकाऱ्यांना घटनेची माहिती नसणे हे संशयाचे बोट निर्माण करीत आहे. दरम्यान, या घटनेमुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

औद्योगिक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन न केल्यास अशा घटना पुन्हा घडू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करू जबाबदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कामगार संघटना आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.

विराज कंपनीतील अपघात आणि प्रदूषणाविरोधात अनेक वेळा तक्रारी व पत्रव्यवहार केला, पण प्रशासनाने आजवर दखल घेतलेली नाही. अधिकारी फक्त प्रस्ताव पाठवल्याचे सांगतात, पण कारवाई मात्र होत नाही. हा नागरिकांच्या जीवाशी चाललेला खेळ आहे.
अमोल गर्जे, सामाजिक कार्यकर्ता, बोईसर.
विराज प्रोफाइल कारखान्यात गरम धातू गळती होऊन कामगारांना दुखापत झाल्याचे समजले, परंतु तशी अधिकृत माहिती मिळालेली नाही.
माधव तोटेवाड, उपसंचालक, औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालय, पालघर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT