बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रात सुरू असलेल्या रस्ता व गटार बांधकामांदरम्यान स्ट्रीट लाईटचे लोखंडी खांब निष्काळजीपणे काढून रस्त्याकडेला भंगारासारखे फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अनेक ठिकाणी हे खांब माती, खडी आणि बांधकाम साहित्याच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने सरकारी मालमत्तेची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे काही खांब वाकलेल्या अवस्थेत तर काही पूर्णपणे गंजू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
तारापूर एमआयडीसी परिसरात सध्या विविध रस्ते व गटार विकासकामे सुरू असून, या कामांसाठी जुन्या स्ट्रीट लाईट व्यवस्था हटविण्यात येत आहे. मात्र हे खांब नियोजनबद्ध पद्धतीने सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्याऐवजी रस्त्याच्या कडेला बेवारस अवस्थेत टाकण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी खांब अर्धवट मातीखाली गाडले गेले असून, काही ठिकाणी बांधकाम यंत्रसामग्रीमुळे त्यांचे नुकसान झाल्याचेही दिसून येत आहे.
स्थानिकांच्या मते, संबंधित खांब व्यवस्थितरीत्या काढून सुरक्षित ठेवले असते तर त्यांचा पुन्हा वापर करणे शक्य झाले असते. काही खांब किरकोळ दुरुस्तीनंतर इतर भागात उपयोगात आणता आले असते.
मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लाखो रुपयांचे साहित्य अक्षरशः भंगारात फेकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘एका बाजूला विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो, तर सरकारी साहित्याची अशी उघडपणे नासाडी केली जाते, हे अत्यंत गंभीर आहे,’ अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, रस्त्याकडेला उघड्यावर पडून असलेल्या लोखंडी खांबांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था नसलेल्या भागात हे खांब वाहनचालक व पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत.
काही ठिकाणी खांबांच्या धारदार भागांमुळे लहान मुलांना व दुचाकीस्वारांना दुखापत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय परिसरात अस्वच्छतेचे चित्र निर्माण झाल्याने पर्यावरणीय प्रश्नही निर्माण होत आहेत.
प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
बांधकाम सुरू असताना सुरक्षेच्या उपाययोजनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. कामाच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा फीत, सूचना फलक किंवा साहित्य संरक्षित ठेवण्याची व्यवस्था नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
संबंधित ठेकेदारांवर कारवाईची मागणी
सरकारी पैशांची किंमत प्रशासनाला नाही का? असा संतप्त सवाल उपस्थित करत नागरिकांनी एमआयडीसी प्रशासनाने या प्रकाराची तातडीने चौकशी करून जबाबदार अधिकारी व संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच वापरण्यायोग्य साहित्याची होणारी नासाडी त्वरित थांबवून ते सुरक्षितरीत्या जतन करण्यात यावे, अशीही मागणी पुढे येत आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात पारदर्शक चौकशी करून संबंधित साहित्याची नोंद, त्याची किंमत आणि त्याच्या विल्हेवाटीबाबतची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. अन्यथा हा प्रकार केवळ निष्काळजीपणाचा नसून सरकारी मालमत्तेच्या अपव्ययाचा गंभीर मुद्दा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.