बोईसर ः तारापूर औद्योगिक क्षेत्र व बोईसर परिसरातून निर्माण होणाऱ्या घातक रासायनिक व जैविक कचऱ्याची ग्रामीण भागात बिनदिक्कत बेकायदा विल्हेवाट लावली जात असून, या गंभीर प्रकारांकडे प्रशासन डोळेझाक करत असल्याचा संतप्त आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. औद्योगिक परिसरातील विषारी कचरा थेट गावपाड्यांमध्ये फेकून शेतजमीन, पर्यावरण आणि मानवी आरोग्याशी उघडपणे खेळ केला जात असताना संबंधित यंत्रणा मात्र निष्क्रिय असल्याचे चित्र आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्र आणि बोईसर परिसरातून तब्बल 200 हून अधिक गोण्यांमध्ये भरलेला इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्यांचा जैविक कचरा बेटेगाव ग्रामपंचायत हद्दीतील नवापाडा येथील शेतजमिनीत टाकण्यात आला असून नियोजित बुलेट ट्रेन स्थानकाजवळील गट क्रमांक 126 मध्ये काही दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात अज्ञात वाहनातून हा घातक कचरा टाकण्यात आल्याचे उघड झाले असून, हा प्रकार अचानक घडलेला नसून नियोजनबद्ध असल्याचा संशय ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
या कचऱ्यामुळे संपूर्ण शेतजमिनीत काचेचे तुकडे पसरले असून, परिसरातील आदिवासी पाड्यातील नागरिक, लहान मुले तसेच गुरेढोरे जखमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जमिनीची सुपीकता कायमस्वरूपी नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे. हा केवळ कचऱ्याचा प्रश्न नसून ग्रामीण नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
याआधीही तारापूर औद्योगिक क्षेत्र आणि बोईसर परिसरातून रासायनिक कचरा, जैविक कचरा, घातक सांडपाणी, रसायने व भंगार यांची बेकायदा विल्हेवाट गावपाड्यांमध्ये लावण्यात आल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र, वारंवार तक्रारी, निवेदने व आंदोलनानंतरही संबंधित प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलीस यंत्रणा केवळ कागदी कारवाईतच अडकून राहिल्याचा आरोप होत आहे.
प्रशासनाला थेट सवाल उपस्थित होत आहेत की, इतक्या मोठ्या प्रमाणात घातक कचरा वाहतूक होत असताना संबंधित वाहनांची तपासणी कुठे होती? प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी नेमके काय करत आहेत? रात्रीच्या वेळी औद्योगिक कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांना कोणाचा आशीर्वाद आहे? दोषी उद्योग, कंत्राटदार व वाहतूकदारांवर कारवाई करण्याची हिंमत प्रशासन दाखवणार की नेहमीप्रमाणे फक्त चौकशीचे नाट्य रंगवले जाणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
या गंभीर प्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून दोषींना अटक करावी, बेकायदा कचरा टाकणाऱ्या उद्योगांवर मोठे आर्थिक दंड व कारखाने सील करण्याची कारवाई करावी, तसेच गावपाड्यांमध्ये सीसीटीव्ही व रात्रगस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.