Industrial Area Fire Tarapur
बोईसर : तारापूर-बोईसर औद्योगिक परिसरात आगीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, गेल्या २४ तासांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या (सीईटीपी) आवारातील भंगार साहित्याला आग लागून मोठे नुकसान झाले, तर बेटेगाव येथील रूपरजत पार्क परिसरातील कामगारांच्या पाच ते सहा झोपड्या आगीत जळून खाक झाल्या. दोन्ही घटनांमध्ये अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही पहिली घटना घडली. केंद्राच्या आवारात भंगार साहित्य साठवून ठेवलेल्या भागात अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. काही क्षणांतच आगीने जोर पकडल्याने परिसरात धावपळ उडाली. या आगीत डिफ्युजरसह अन्य जुने भंगार साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच तारापूर अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन अग्निशमन बंबांसह घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करून सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान, दुसरी घटना शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बोईसरजवळील बेटेगाव येथील रूपरजत पार्क परिसरात घडली. येथे कामगारांच्या वास्तव्यासाठी उभारण्यात आलेल्या झोपड्यांना अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केल्याने पाच ते सहा झोपड्या आगीच्या विळख्यात सापडून जळून खाक झाल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने एका बंबासह घटनास्थळी पोहोचून पाण्याचा मारा केला. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे विझवण्यात जवानांना यश आले.
औद्योगिक परिसरातील भंगार साहित्याचा साठा आणि कामगारांच्या दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये घडलेल्या या दोन घटनांमुळे परिसरातील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, अग्निशमन दलाने वेळीच केलेल्या कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.