सावरोली गावाजवळील तानसा नदी पुलाला भेगा  pudhari photo
पालघर

Cracks on Tansa river bridge: सावरोली गावाजवळील तानसा नदी पुलाला भेगा

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे संकट

पुढारी वृत्तसेवा
वाडा : मच्छिंद्र आगिवले

वाडा ते वाशिंद हा मार्ग नाशिक महामार्गाला जोडणारा सोयीचा दुवा असून ठाणे व कल्याणकडे जाण्यासाठी अलिकडे सर्वात जास्त वापरला जाणारा रस्ता आहे. सोमवारी या मार्गावरील सावरोली गावाजवळील तानसा नदीच्या पुलाला तडा जाऊन पुलावरच काही ठिकाणी रस्ता खचल्याचे निदर्शनास आले. सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे या मार्गावर होणार्‍या अतिशय अवजड वाहतुकीचे हे फलित असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

वाडा तालुक्यातील कांबारे ते वाशिंद या मार्गाचे नुकताच डांबरीकरण करण्यात आले तर दुसरीकडे वाडा ते भिवंडी महामार्गाची अवस्था भीषण झाल्याने वाशिंद मार्गे ठाणे व कल्याण शहरांकडे जाण्याचा कल याच मार्गे वाढू लागला आहे. वेळ व टोल वाचविण्यासाठी अलीकडे अचानक या मार्गावरून अवजड वाहनांनी आपला मोर्चा वळविल्याने रस्त्याची अवस्था अतिशय भीषण बनली आहे. त्यातच शंभर ते दीडशे टन वजनाच्या गाड्या येजा करू लागल्याने रस्ता पूर्णपणे संपुष्टात आला शिवाय अपघातांची संख्या देखील वाढली आहे. सावरोली गावाजवळील पुलाला उभी भेग गेली असून काही ठिकाणी रस्ता खचल्याचे पहायला मिळत आहे.

अवजड वाहनांच्या धक्क्याने हा पूल कमकुवत बनला असून सावित्री नदीवरील दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. सोमवारी ही बाब लक्षात येताच रात्रीपासून पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पुलाची पाहणी केली असून पुलाचे सर्व्हेक्षण केले जाईल असे सांगण्यात आले. या परिसरातील रहिवाशांना याचा मोठा फटका सहन करावा लागणार असून शाळकरी विद्यार्थ्यांसह नोकरदार बेजार होणार आहेत.

अवजड वाहनांना कुणाचे बळ?

वाशिंद भागासह नाशिक मार्गे येणार्‍या वाहनांना टोलपासून मुक्ती मिळून भिवंडी मार्गे वाडा येण्याचा मोठा वाचत असल्याने वाहने थेट वाशिंद - कांबारे मार्गे शिरकाव करतात. सावरोली व वांद्रे अशा दोन ठिकाणी वन विभागाचे तपासणी नाके आहेत मात्र तिथेही चिरीमिरी घेऊन वाहनांना हिरवा कंदील दाखविला जातो असे स्थानिक सांगतात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांचे तर या समस्येकडे दुर्लक्षच असल्याने पुलाला अखेर बाधा निर्माण झाली असा स्थानिकांचा आरोप आहे.

पुलाचे तज्ञ टीम कडून पाहणी करून परीक्षण केले जाईल त्यानंतर पुलावरून हलकी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. तातडीने या मार्गावरून अवजड वाहतूक बंद करण्याची कार्यवाही केली जाईल शिवाय नवीन पुलाच्या उभारणीसाठी प्रस्ताव पाठविला जाईल.
सिद्धार्थ तांबे, अधिक्षक अभियंता, सा.बांध.विभाग ठाणे.
अवजड वाहतुकीमुळे स्थानिक जनता मेटाकुटीला आली असून या बेलगाम वाहनांना कुणाचा धाक आहे का नाही ? वन विभागाचे रस्त्याच्या सुरक्षा कामांना विरोध असतो मग येजा करणार्‍या अवजड वाहनांकडून पैसे कसे घेता? सगळी अंधाधुंद अवस्था सुरू असून पोलीस, पिडब्लुडी व वन विभागाचे दुर्लक्ष पुलाला बाधले आहे.
भगवान पाटील, स्थानिक रहिवाशी, सावरोली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT