आसनगाव : शहापूर तालुका म्हटला की, निसर्गाने मुक्त हस्ते केलेली निसर्ग सौंदर्याची उधळण या ठिकाणी पाहावयास मिळते. कसारा घाट, घाटघर, आजा पर्वत, किल्ले माहुली, जांभे धरण, अशोका धबधबा तसेच भातसा, तानसा, मोडक सागर, ही धरणे आणि याच परिसरात डोळ्यांचे पारणे फेडणारा निसर्गरम्य परिसर यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, गुजरातकडील पर्यटकांची पावले वळतात ती शहापूरकडे. यातच आता भर पडली आहे ती तानसा अभयारण्यातील टँगो धबधब्याची. हा धबधबा पर्यटकांना खुणावतो आहे.
तानसा अभयारण्यात मोडकसागर ते तानसा असा रस्ता जातो त्या ठिकाणी बेलवड गावापुढे घनदाट झाडीत हा धबधबा जणू लपलेला आहे. या रस्त्याने जाताना या धबधब्याच्या शुभ्र फेसाळणार्या पाण्याच्या आवाजानेच वाहनचालकांच्या गाडीला ब्रेक लागतो व हा धबधबा पाहण्याचा मोह आवरता येत नाही.
या परिसरात पर्यटकांना तानसा अभयारण्याची भटकंती करता येते. अभयारण्य असल्यामुळे पक्षांचे वेगवेगळे आवाज कानी ऐकू येतात. दुर्मिळ पक्षीही यावेळी नजरेत पडतात. विशेष म्हणजे निसर्ग अभ्यासक, छायाचित्रकार व पर्यटक यांच्यासाठी टँगो धबधबा पावसाळी सहलीसाठी पर्वणीच ठरत आहे.
शहापूर तालुक्यातील मध्य रेल्वेच्या खर्डी स्टेशनवरून प्रवासी वाहतूक जीपने टेंभा येथे जावे लागते व या ठिकाणी असलेल्या मोडकसागर धरणाला भेट देऊन पुन्हा टेंभा, बेलवड, मार्गे टँगो धबधब्यावर पोहचता येते. खर्डी ते टँगो धबधबा अंतर 20 किलो मीटर आहे तसेच पालघर मार्गे येणार्या पर्यटकांना वाडा मार्गे सोनाळे, कलंभे, बेलवड, असा प्रवास करून पोहोचता येते. वाडा-टँगो धबधबा अंतर हे 24 किलो मीटर आहे.
हा धबधबा अभयारण्याच्या कुशीत वसलेला असल्याने या ठिकाणी खाण्या-पिण्याची व्यवस्था नाही म्हणून पर्यटक दिवसभराचे खाद्य, पिण्याचे पाणी आपल्या सोबत घेऊन जावे. पर्यटनाच्या दृष्टीने या धबधब्याचे महत्व वाढत असून पर्यटकांची पावले आपसुकच येथे वळत आहेत.