तलासरी : सुरेश वळवी
पुण्यातील विविध जमीन घोटाळे समोर आल्यानंतर आता पालघर मधील तलासरी तालुक्यात मोठा भूखंड घोटाळा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणला आहे. तलासरी तालुक्यातील काजळी सामुदायिक शेती सहकारी संस्था या सहकारी संस्थेच्या तत्कालीन अध्यक्ष व त्यांच्यासह असलेल्या इतर सहकाऱ्यांनी मिळून संगणमताने संस्थेचे नुकसान व फसवणूक करून स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी अपहार केल्याची बाब समोर आली आहे.
सदर संस्थेच्या2016-17 ते 2022-23 या मुदतीच्या लेखापरीक्षण अहवालामध्ये सामुदायिक शेती सहकारी संस्थेत अपहाराबाबतचा गंभीर दोषारोप ठेवण्यात आले असून यासंदर्भात तलासरी पोलिसांना सहाय्यक निबंधक सहकारी संस्था डहाणू लेखापरीक्षक यांच्यामार्फत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासंबंधीचे तक्रार अर्ज देण्यात आला आहे. मात्र याबाबत अद्यापही अपहाराबाबत कुठलाही गुन्हा नोंदवण्यात आल्या नसल्याने पुण्याप्रमाणे तलासरी तालुक्यातील काजळी येथे सगळ्यात मोठा भूखंड घोटाळा दडपण्यासाठी प्रयत्न सुरू आहे का, असे प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत.
तलासरी तालुक्यातील काजळी येथील काजळी सामुदायिक शेती सहकारी संस्था मर्यादित ही संस्था सहकारी संस्थेच्या नोंदणी अंतर्गत सन 1973 नोंदणी झाली होती. सदर संस्था पोटनिमातील उद्देशाप्रमाणे कामकाज करत नसल्यामुळे काजळी सामुदायिक शेती सहकारी संस्था, ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 102(2) नुसार 2021 रोजी अवसायनात घेण्यात आली होती. संस्थेच्या वैद्यानिक लेखापरीक्षण करतेवेळी संस्थेमध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81 (5)(व) प्रमाणे अपहार व फसवणूक दोषाबाबत कारवाई करण्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे.
अहवालामध्ये तत्कालीन पदाधिकारी यांनी संस्थेची 70 लाखाची अफरातफर करत संस्थेची व सभासदांच्या अन्यायाने व विश्वासघात करून फसवणूक करून स्वतःचा स्वार्थासाठी आर्थिक लाभासाठी अपहार केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये काजळी समुदायिक शेती सहकारी संस्था मर्यादित यांच्या नावे असलेली संस्थेची जमीन 20 - 27- 00 हेक्टर आर चौरस मीटर जमीन याची शासकीय बाजारभाव प्रमाणे किंमत 6 कोटी 39 लाख 27 हजार 100 रुपये एवढी असताना देखील तत्कालीन पदाधिकारी यांनी संगनमताने 70 लाख या कवडीमोल दराने विक्री करत संस्थेची फसवणूक व अपहार केल्याचा ठपका या अहवालामध्ये ठेवण्यात आला आहे.
हा संपूर्ण व्यवहार काजळी सामुदायिक शेती सहकारी संस्था मर्यादित याचे तत्कालीन अध्यक्ष इतर सहकाऱ्यांनी मिळून कोणतीही मासिक सभा, पूर्व मंजुरी मान्यता न घेता परस्पर विक्री व्यवहार केल्याचे लेखापरीक्षणात नमूद करण्यात आले आहे. तसेच या संबंधित झालेला आर्थिक देवाणघेवाणीच्या व अपहाराचा अवसायक उमाकांत नानाजी चेटूले व तत्कालीन सहायक निबंधक अजय गुजराती यांना जाणीव असताना देखील आपल्या पदाचा गैरवापर करत संस्थेची जमीन विक्रीचे दस्त स्वतःचा फायदा करता करून दिल्याचे निरीक्षण अहवालात म्हटले आहे.
सदर संस्थेच्या भूखंडाच्या विक्रीचे नियमाचे उलंघन करून केलेले व्यवहार रद्द करण्यात येणे गरजेचे असताना देखील अवसायक व संस्थेचे पदाधिकारी यांनी करोडोचा भूखंड कवडीमोल भावात विक्री करत शासनाची व संस्था पदाधिकाऱ्यांची फसवणूक केली आहे. या संदर्भात संबंधित व्यक्तींवर भारतीय दंड विधान भारतीय न्यायसहितेनुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग एक यांच्या कार्यालयामार्फत करण्यात आली आहे. या भूखंड घोटाळ्यात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आमच्या कार्यालयामार्फत कारवाई सुरू असून काजळी सामुदायिक शेती सहकारी संस्थेबाबत लेखापरीक्षका मार्फत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आले आहे.शिरीष कुलकर्णी, जिल्हा उपनिबंधक, पालघर