कासा : सूर्या प्रकल्पांतर्गत डहाणू व पालघर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उन्हाळी हंगामात दिलासा देणारा निर्णय घेत डाव्या तिर कालव्यातून शेतीसाठी पाणीपुरवठा 30 डिसेंबरपासून सुरू करण्यात आला आहे. उजव्या तिर कालव्यावरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील दोन दिवसांत या कालव्यातूनही पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.
सूर्या प्रकल्पाच्या डाव्या तिर मुख्य कालव्याच्या पहिल्या टप्प्यातील 1 ते 7 किलोमीटर अंतराच्या कालव्याचे अस्तरीकरण पूर्ण करण्यात आले आहे. या दुरुस्तीमुळे कालव्याच्या पाण्याच्या प्रवाहाला लक्षणीय गती मिळाली असून सध्या कालव्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पाणी पोहोचणे शक्य झाले आहे. परिणामी, डहाणू व पालघर तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, उजव्या तिर कालव्यावर सुरू असलेल्या दुरुस्ती व अस्तरीकरणाच्या कामामुळे सध्या त्या कालव्यातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. हे काम पूर्ण होताच दोन दिवसांत उजव्या कालव्यातूनही पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.
डाव्या तिर मुख्य कालव्याची एकूण लांबी सुमारे 29 किलोमीटर असून यापैकी पहिल्या 7 किलोमीटरचा अस्तरीकरणाचा टप्पा पूर्ण झाला आहे. तसेच उजव्या तिर कालव्याची एकूण लांबी 33 किलोमीटर इतकी असून या कालव्याच्या देखील 1 ते 7 किलोमीटर या पहिल्या टप्प्यातील अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित टप्प्यांसाठी आवश्यक काम प्रस्तावित असून त्यानंतर पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.
मुख्य कालव्यावरून शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या लघु कालव्यांची दुरुस्ती, गाळ काढणे व पाणी वहन क्षमता वाढविण्याची कामेही हाती घेण्यात आली आहेत. या उपाययोजनांमुळे कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचेल, असा विश्वास पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे.
कालव्यांच्या दुरुस्तीमुळे यंदाच्या उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली असून पाणीपुरवठा सुरळीत झाल्यास शेती उत्पादनावर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.