खानिवडे : शारीरिक वेदना, उपचारांचा कठीण प्रवास आणि अभ्यासातील खंड… या सर्व संकटांवर मात करत वसई तालुक्यातील ग्रामीण भागातील अद्वैती परेश कुडू हिने दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या जिद्दीच्या आणि संघर्षमय यशाच्या प्रवासाने अनेक विद्यार्थ्यांसमोर प्रेरणेचा आदर्श निर्माण केला आहे.
प्रतिभा विद्यामंदिर, खानिवडे येथे शिक्षण घेणाऱ्या अद्वैतीला इयत्ता सातवीत असतानाच एका दुर्धर आजाराने ग्रासले. उपचारांमुळे तिला सहावी आणि सातवीच्या नियमित शिक्षणापासून दूर राहावे लागले. मात्र प्रतिकूल परिस्थितीतही तिने अभ्यासाची साथ सोडली नाही. उपचार सुरू असतानाच तिने आठवीची परीक्षा दिली आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली.
मात्र नववीत असताना पुन्हा आजाराने डोके वर काढले आणि तिला संपूर्ण वर्ष अभ्यासापासून दूर राहण्याची वेळ आली. तरीदेखील अद्वैती खचली नाही. कठोर उपचारांचा सामना करत तिने अभ्यास सुरू ठेवला. एकीकडे उपचारांचा वेदनादायी प्रवास आणि दुसरीकडे मुलीच्या भवितव्यासाठी आई-वडिलांची धडपड — या सर्वांमधून अद्वैतीने विलक्षण मानसिक ताकद दाखवली. पेशाने शिक्षक असलेल्या आई-वडिलांचे मार्गदर्शन आणि स्वतःची प्रचंड जिद्द यांच्या जोरावर तिने पुन्हा उभारी घेतली. परिस्थितीला दोष न देता हसतमुखाने संकटांचा सामना करत ती दहावीच्या बोर्ड परीक्षेला सामोरी गेली आणि थेट शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला.
अद्वैतीच्या या यशामुळे शिरसाड परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून तिचा संघर्षमय प्रवास इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. “परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते,” हे अद्वैतीने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील प्रतिभा विद्यामंदिर, खानिवडे या शाळेने यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेचा निकाल ९३.५१ टक्के लागला असून १९ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर २२ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. यामध्ये अद्वैती परेश कुडू प्रथम, ८९.८० टक्के गुणांसह समृद्धी किशोर पाटील व हार्दिक हर्षद घरत द्वितीय, तर अमेय अनिल पाटील आणि तनिष्का संदीप ठाकूर यांनी ८७.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
अद्वैती कुडू ह्या विद्यार्थ्यांनीची इयत्ता पाचवी व सहावी ही दोन वर्ष करोना काळात गेली.तर सातवी मध्ये असताना दुर्धर आजाराने ग्रस्त झाली. यात वर्षभर उपचार घेऊन आजारावरती मात करत इयत्ता आठवी मध्ये दाखल झाली. आठवी पास झाल्यानंतर पुन्हा त्याच आजाराने ग्रस्त झाली व नववीचे संपूर्ण वर्ष मुंबईच्या एका रुग्णालयात राहावं लागलं.मात्र पुन्हा त्या आजारावरती मात करत त्याच उमेदीने त्या जिद्दीने संघर्ष करून दहावीच्या वर्गात दाखल झाली आणि अभूतपूर्व यश मिळवले.