तलासरी : तलासरी तालुक्यातील वेवजी येथील लोकभारती संस्थेच्या भारती अकादमी इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी वार्षिक क्रीडा स्पर्धेअंतर्गत आयोजित मॅरेथॉन शर्यतीत तृतीय क्रमांक पटकावल्यानंतर अवघ्या काही वेळातच रोशनी गोस्वामी (15) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे उंबरगाव व तलासरी तालुक्यात शोककळा पसरली आहे.
शनिवार 3 जानेवारी रोजी तलासरी तालुक्यातील वेवजी सोरठपाडा येथील भारती अकादमीमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 10 वी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या उंबरगाव येथील रोशनी गोस्वामी या विद्यार्थिनीने मोठ्या हिमतीने धावत तिसरा क्रमांक मिळवला. मात्र, विजयाचा आनंद साजरा करण्यापूर्वीच काळाने तिच्यावर झडप घातली.
शर्यत संपल्यानंतर तिला प्रचंड धाप लागली होती. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ती मैदानावर खाली बसली आणि काही क्षणांतच बेशुद्ध पडली. शाळेने तिला तातडीने जवळच्या गुजरातमधील उंबरगाव येथील रुग्णालयात हलवले, मात्र उपचारापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शाळा व्यवस्थापकांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. या घटनेनंतर याप्रकरणी घोलवड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
माझ्या मुलीला काहीही झाले नव्हते. ती सकाळी नियमित वेळेवर उठली. घरात स्वयंपाक केला आणि भावाला जेवणाचा डबा दिला. स्वतः नाश्ता केल्यानंतर तिने मॅरेथॉनला जाते म्हणून सांगितले आणि दुपारी मला शाळेकडून माझ्या मुलीच्या मृत्यूची बातमी देण्यात आली.सुनीताबेन गोस्वामी, मृत विद्यार्थिनीची आई