Dhanivari truck accident pudhari photo
पालघर

Palghar Accident : धानिवारीत भरधाव ट्रक थेट घरात घुसला; सुरक्षा उपाययोजना नाही,ग्रामस्थांचा संताप

सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली.

पुढारी वृत्तसेवा

कासा ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानिवरी परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात 14 जणांचा मृत्यू झाल्यानंतरही संबंधित यंत्रणांनी कोणत्याही ठोस सुरक्षा उपाययोजना केल्या नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शुक्रवारी याच परिसरात आणखी एक गंभीर अपघात घडला असून, भरधाव ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्यालगतच्या एका घरात घुसला. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली.

धानोरी परिसरातील धोकादायक वळण आणि महामार्गालगतची अपुरी सुरक्षा व्यवस्था याबाबत स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी साखरपुड्यासाठी आलेल्या वाहनाचा भीषण अपघात होऊन 14 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी सुरक्षिततेबाबत विविध आश्वासने दिली होती. मात्र प्रत्यक्षात कोणतीही प्रभावी उपाययोजना राबविण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अपघातग्रस्त ठिकाणी अद्यापही मजबूत बॅरिकेड्स, संरक्षक भिंती किंवा वेग नियंत्रणासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे या भागालगतचा सर्व्हिस रोड गावकरी आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वापरात असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. या नव्या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

“14 जणांचा बळी गेल्यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अपघातानंतर घटनास्थळी भेटी देऊन आश्वासनांचा वर्षाव करणारे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी आता कुठे आहेत, अशीही विचारणा ग्रामस्थांनी केली.महामार्ग विकासाच्या दाव्यांबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मत परिसरातून व्यक्त होत आहे. पहिल्या घडलेल्या या भीषण दुर्घटनेनंतर तरी तातडीने आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या असत्या, तर आजची घटनाही टाळता आली असती, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT