मोखाडा : शिवसेनेचा आदिवासी चेहरा आणि शिवसेनेचे पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम या नावा भोवती सध्या पालघर जिल्ह्यातील राजकारण फिरताना दिसत असून गेल्या काही महिन्यांपासून प्रकाश निकम हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे .प्रकाश निकम यांचा प्रवेश होईल की नाही होईल हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
मात्र मोखाडा भाजपची एक नुकतीच बैठक पार पडली या बैठकीमध्ये काही भाजप कार्यकर्त्यांनी प्रकाश निकम यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये असे सांगितले. तर यानंतर मोखाडा शिवसेनेची सुद्धा एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली यामध्ये काही कार्यकर्त्यांनी प्रकाश निकम यांनी शिवसेना सोडू नये असे आर्जव केले तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद कदम यांनी निकम यांची समजूत काढली जाईल असे आश्वासन यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना दिले. यामुळे भाजपच्या बैठकीमध्ये शिवसेना विरोध तर शिवसेनेच्या बैठकीमध्ये भाजप विरोध दिसून आला असे असताना निकम यांनी मात्र अद्याप पर्यंत आपली भूमिका स्पष्ट न केल्यामुळे अधिक गोंधळ वाढला असून तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
खरंतर प्रकाश निकम या नावाची चर्चा खर्या अर्थाने सुरू झाली ती 2019 लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपकडे लोकसभा लढवणारा चेहरा नसल्याकारणाने त्यावेळी सुद्धा प्रकाश निकम यांची लोकसभा भाजपच्या तिकिटावर लढणार अशी चर्चा सुरू होती.मात्र त्यावेळी भाजपने हेमंत सवरा यांना उमेदवारी दिली यानंतर तत्कालीन पालकमंत्री आणि सध्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी प्रकाश निकम यांची सलगी वाढली त्यातूनच विक्रमगड विधानसभेमध्ये भाजपकडून प्रकाश निकम यांना उमेदवारी दिली जाईल अशी अटकळ बांधली जात होती आणि प्रकाश निकम यांनी सुद्धा भाजपाने मला शब्द दिल्याचे तेव्हा सांगितले होते.यामुळे नाराज प्रकाश निकम यांनी महायुतीमध्ये बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज भरला होता.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा प्रकाश निकम यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता मात्र तरीसुद्धा प्रकाश निकम यांनी बंडाचे निशाण कायम ठेवून आपली उमेदवारी कायम ठेवली यामुळे महायुतीच्या विरोधात भूमिका घेतल्याचे कारण सांगत शिवसेनेकडून प्रकाश निकम यांचे निलंबन करण्यात आले होते तेव्हापासून खरंतर प्रकाश निकम शिवसेनेमध्ये सक्रिय दिसून आले नाही त्यातूनच निकम हे आता भाजपमध्ये जाणार अशी चर्चा जोर धरू लागली होती. मध्यंतरी ही चर्चा मावळल्यानंतर पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर या चर्चेला उधाण आले असून भाजपच्या गोटात सुद्धा कही खुशी कही गमचे वातावरण आहे कारण प्रकाश निकम यांच्या समवेत अनेक त्यांचे समर्थक जावू शकतात याशिवाय निकम मास लीडर असून त्यांचा जनाधार मोठा आहे.
त्यामुळे त्यांच्या जाण्याने भाजपामध्ये जागा वाटपाचा तिढा उभा राहू शकतो असे ज्या पदाधिकार्यांना वाटते त्यांनी निकम यांच्या भाजप प्रवेशाला तालुका बैठकीत विरोध केल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे निकम हे जर भाजपमध्ये गेले तर मोखाडा शिवसेनेला याचे मोठे नुकसान होऊ शकते यामुळे मोखाडा शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल पाटील यांनी एक बैठक घेतली या बैठकीचा मूळ उद्देश शिवसेना फुटू नये हाच होता मात्र या बैठकीत सुद्धा कार्यकर्त्यांनी प्रकाश निकम यांनी भाजपमध्ये जाऊ नये असा सूर धरला तर काहींनी थेट भाजपच्या विरोधात भूमिका घेऊन जो भाजप मित्र पक्ष असला तरी वेळोवेळी आपला विश्वास घात केल्याचे सांगत संताप व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.
सध्या मोखाडा तालुका पर्यायाने जिल्ह्यात निकम यांच्या नावाभोवती राजकारण फिरत आहे. महत्वाचे म्हणजे या बैठकीला निकम अनुपस्थित होते मात्र त्यांचे कट्टर समर्थक म्हणून गणले जाणारे कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते यामुळे आता निकम यांची समजूत काढली जावून ते शिवसेनेतच राहणार की भाजपत जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
माझी भाजपच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्यांशी याबाबत बोलणी झालेली नाही मला ज्या पक्षात मान सन्मान मिळेल त्या पक्षात मी काम करेन, माझ्या पक्षप्रवेशाच्या केवळ वावड्या उडवल्या जात आहेत मी अद्याप पर्यंत असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. ज्या दिवशी माझा असा कोणता निर्णय होईल त्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाईल.प्रकाश निकम, माजी जिप अध्यक्ष,पालघर.