नवसू वळवी pudhari photo
पालघर

Navsu Valvi death : वनौषधींचा जाणता अवलिया नवसू वळवी अनंतात विलीन

आदिवासी बांधवांमधील व्यसनाधीनता दूर करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे काम

पुढारी वृत्तसेवा

खोडाळा : एक तेजोमय ज्योत म्हणून संपूर्ण आयुष्य इतरांची सेवा करण्यासाठी समर्पित करणारा एक कर्मयोगी, उत्तम विचारवंत, सर्जनशील वनौषधी अभ्यासक आणि खरा समाजसेवक असलेले नवसू महादू वळवी हे बुधवारी अनंतात विलीन झाले आहे. त्यांच्या जाण्याने आदिवासी समाजाबरोबरच तमाम मोखाडा तालुक्याची अपरिमित हानी झालेली आहे. मृत्यसमयी ते 86 वर्षांचे होते.त्यांच्यापश्चात तीन मुली, नऊ नातवंडे आणि दोन लहान भाऊ आहेत.

तारुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडल्यानंतर त्यांनी आपल्या आदिवासी बांधवांमधील व्यसनाधीनता दूर करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे काम व्यापक स्वरूपात केलं आहे. सामाजिक बांधिलकीतून सुंदर नारायण गणेश संस्कार केंद्र देवबांध येथे कार्य करत असताना सार्वजनिक गणेशोत्सव एक गाव एक गणपती, अंधश्रद्धा निर्मूलन यावर विशेष भर दिला. त्यांच्या सामाजिक कार्याची जाण ठेवत सोमय्या परिवाराद्वारे त्यांना पुरस्कृत करण्यात येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक समर्पित कार्यकर्ता म्हणून त्यांना डॉक्टर हेडगेवार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

वनौषधींचा शोध घेत संपूर्ण आयुष्य व्रतस्थपणे जंगलात वेचणारे नवसू महादू वळवी यांनी हिमालय ते कन्याकुमारी असा विविध भागातील जंगल संपत्तीचा सखोल अभ्यास करत प्रवास केला आहे.तेथील वनस्पतींचे उत्तम ज्ञान घेतले असून वनस्पती शास्त्राचे एक चालते बोलते विद्यापीठ असणार्‍या या व्यक्तीकडे मुंबई- पुण्याहून वनस्पतींची माहिती घेण्यासाठी अनेक संशोधक येत होते. अतिशय उत्तमपणे वनस्पती शास्त्राची माहिती ते विद्यार्थ्यांना देत.

एक उत्तम वैदू म्हणून विविध आजारांवर ते वनौषधी देत होते .त्यांच्या या कार्याबद्दलच अंबरनाथ संस्थेद्वारे दधिची हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. निसर्ग आणि त्याचे संगोपन या दृष्टीने वनांचे महत्त्व आणि वनस्पतींचे जतन संवर्धन व वनस्पतींचे महत्त्व जाणणार्‍या या व्यक्तीने आपल्या अवतीभोवती जंगल कसं जिवंत राहील, यासाठी मेहनत घेतली. त्यांच्या या कार्यातूनच त्यांना वनबंधू हा पुरस्कार देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT