पालघर

Palghar News : गळक्या छताखाली चिमुकल्यांचे शिक्षण; शिरसाड अंगणवाडीची धोकादायक अवस्था

children’s education safety: सिमेंट पत्र्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : वसई पूर्वेतील शिरसाड गावातील अंगणवाडीची इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक बनली असून गळक्या छताखाली चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. छतावरील सिमेंटच्या पत्र्यांना तडे गेल्याने पावसाचे पाणी थेट वर्गात गळत असून, संपूर्ण अंगणवाडीत पाणी साचत आहे. त्यामुळे बालकांना ओलसर व असुरक्षित वातावरणात बसून शिक्षण घ्यावे लागत असून, त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

अंगणवाडीच्या छतावरील अनेक पत्रे तुटलेली असून काही ठिकाणी ती सैल झाली आहेत. मुसळधार पाऊस किंवा जोरदार वाऱ्यामुळे ही पत्रे कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, लहान मुलांच्या जीविताशी संबंधित या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

शिरसाडमधील अंगणवाडीसह परिसरातील काही अन्य अंगणवाड्यांमध्येही गळक्या छताची समस्या असल्याचे समोर आले आहे. अंगणवाडी ही बालकांच्या शिक्षण, पोषण व आरोग्याची पहिली पायरी मानली जाते. अशा ठिकाणी सुरक्षित आणि सुस्थितीत वातावरण असणे अपेक्षित असताना मुलांना धोकादायक इमारतीत शिक्षण घ्यावे लागत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

स्थानिक नागरिकांनी महिला व बालविकास विभाग आणि संबंधित प्रशासनाकडे वारंवार दुरुस्तीची मागणी केल्याचा दावा केला आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्यापूर्वी प्रशासनाने अंगणवाडीची तातडीने पाहणी करून फुटलेले छत बदलावे, इमारतीची दुरुस्ती करावी आणि चिमुकल्यांच्या सुरक्षित शिक्षणाची हमी द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT