पालघर शहर: शिरगाव येथे अनेक वर्षाची परंपरा असलेला सप्तश्रुंगी देवीचा (बोहाडा-सोंग) उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या बोहाडा उत्सवात रात्रभर देवी-देवतांचे अवतार परिधान करून अनेक कथा साकारल्या जातात. सप्तशृंगी देवी, महिषासुर वध हे दृश्य पाहण्यासाठी आणि देवीचे दर्शन घेऊन नवस फेडण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
पालघर तालुक्यातील शिरगाव येथे परंपरेनुसार अनेक वर्षांपासून सप्तशृंगी देवीचा उत्सव साजरा करण्यात येतो. विविध मुखवटे परिधान करून साजरा होणारा सप्तशृंगी देवीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शिरगाव येथील सप्तशृंगी माता मंदिर व गाव परिसरात पारंपारिक देव-देवी, दानव यांचे मुखवटे गावातील भाविक परिधान करून सहभागी झाले.
या उत्सवात गणपती, गजासुर, दुर्गादेवी, राम-लक्ष्मण, हनुमान, त्राटिका, महिषासुर, दानव आणि सप्तशृंगी देवी असे विविध मुखवटे परिधान करत सहभागी झाले. शिरगाव येथील सप्तशृंगी देवी मंदिर परिसरात व संपूर्ण गावात विविध मुखवटेे खेळगडी पारंपरिक वाद्यांच्या वादनातून ठेका धरून विशिष्ट पद्धतीने नाचून देवतांची व राक्षसांची लढाई प्रतीकात्मक रूपात सादर करण्यात आली.
सकाळच्या सुमारास गावातील विविध आळीत सप्तशृंगी देवीच्या स्वागतासाठी फुले रांगोळ्यांनी सजलेले रस्ते सजवण्यात आले. सोंगांचा हा अनोखा नाच, खेळ पाहण्यासाठी आणि देवीचे दर्शन घेऊन नवस फेडण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक, तरुण- तरुणी, अबाल वृद्ध, भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याचे चित्र यावेळी पाहावयास मिळाले.