खोडाळा : मोखाडा तालुक्यातील दुधगाव येथील अवघ्या 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून आम्ले गाव येथील जंगलात नेऊन धमकी देऊन शारिरीक संबंध ठेवले. याबाबतची तक्रार दि 1 नोव्हेंबरला पिडीत मुलीच्या आईने मोखाडा पोलिस ठाण्यात नोंदवली असून आरोपी हरेष काशीनाथ ठोमरे याला पोलिसांनी पोक्सो कायद्या अंतर्गत अटक केली आहे. त्याला भिवंडी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत मोखाडा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हरेष काशीनाथ ठोमरे (वय वर्षे 24) राहणार दुधगाव याने येथील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फुस लावली व आम्ले गावा नजिकच्या जंगलात नेऊन तीला धमकी दिली व बळजबरीने तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. ही घटना मुलीच्या घरच्यांना समजली असता सदर पिडीत मुलीच्या आईने थेट मोखाडा पोलिस ठाणे गाठले व तक्रार नोंदवली. तक्रारी वरुन मोखाडा पोलिसांनी हरेष विरोधात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे . तक्रार नोंद होताच आरोपी हरेष हा फरार झाला होता.त्याचा शोध घेऊन अटक केली असून भिवंडी प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता त्याला 3 दिवसांची पोलिस कस्टडी सुनावण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विकास दरगुडे करत आहेत.
मोखाडा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याची ही आठवडा भरातील दुसरी घटना असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या घटने नंतर मोखाडा तालुका चांगलाच चर्चेत आला आहे. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने 2012 मध्ये पोक्सो कायदा (पोसको) लागू केला होता. पोक्सो हे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्च्युअल ओफेन्सेसचे लघुरूप आहे. या कायद्यात अशा गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे.