विरार : मिरा रोड येथील मिलाप को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत एका ३१ वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृतदेह निळ्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख प्रकाश सिंग (वय ३१) असे असून, तो मूळचा नेपाळचा रहिवासी होता. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली असून, मृत्यूचे कारण हत्या असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रकाश सिंग काही दिवसांपासून आपला जावई गणेश विश्वकर्मा यांच्या घरी वास्तव्यास होता. दरम्यान, शनिवारी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास निळ्या रंगाच्या प्लास्टिक ड्रममधून दुर्गंधी येऊ लागली. संशय आल्याने विश्वकर्मा यांनी ड्रम उघडून पाहिले असता, त्यामध्ये प्रकाश सिंगचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला. प्रथम त्याला तेम्भा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र शरीरावर जखमा आढळून आल्यामुळे पुढील तपासासाठी मृतदेह जेजे रुग्णालयात हलवण्यात आला. डॉक्टरांनी यामध्ये हत्येचा संशय व्यक्त करत, शवविच्छेदन अहवालाची वाट पाहण्याचे सूचित केले आहे.
सध्या या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी, मृतदेहाची स्थिती, शरीरावरील जखमा आणि ड्रममध्ये ठेवण्यात आलेल्या अवस्थेवरून पोलिसांनी तपासाची दिशा संशयाच्या आधारावर पुढे नेली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मृताच्या नातेवाइकांची चौकशी आणि फोन रेकॉर्ड तपासण्यात येत आहेत.
या प्रकरणात निळ्या रंगाच्या ड्रमचा उल्लेख असल्याने, काही महिन्यांपूर्वी मेरठमध्ये घडलेल्या एका चर्चित हत्येची आठवण नागरिकांना झाली. मात्र पोलिसांनी स्पष्ट केले आहे की मिरा रोड येथील घटनेचा मेरठ प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नाही. केवळ ड्रमचा रंग आणि मृतदेह ठेवण्याची पद्धत यात साम्य असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.
दरम्यान, प्रकाश सिंगच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. परिसरातील रहिवासी देखील धास्तावले असून, सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून तपास अधिक गतीने सुरू असून, लवकरच सत्य समोर येईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दैनिक पुढारी च्या प्रतिनिधींनी डीसीपी परिमंडळ १ प्रकाश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यामध्ये योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे त्याचबरोबर पोस्टमार्टम चा अहवाल आल्यानंतर या संदर्भातील पुढील कारवाई करण्यात येईल असे देखील सांगितले.