पालघर

पायी चालणाऱ्या शाळा शिक्षिकेला अवजड आयवा ट्रकने चिरडले, शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू

वसईच्या शिरसाड नाक्यावरील घटना

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे: वसई पूर्वेतील गजबजलेल्या शिरसाड नाक्यावर शनिवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. शाळेत कर्तव्यावर जात असताना एका ४० वर्षीय शिक्षिकेला भरधाव आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयवा ट्रकने चिरडले. या अपघातात शिक्षिकेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, घटनेनंतर ट्रकचालक वाहन घेऊन फरार झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण वसई तालुक्यात शोककळा पसरली असून बेशिस्त वाहतुकीबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नेमकी घटना काय?

वसई पश्चिमेतील निर्मळ परिसरातील रहिवासी असलेल्या स्वीडन गोम्स (वय ४० वर्षे) या तिल्हेर मस्कर पाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. शनिवारची सकाळची शाळा असल्याने त्या नेहमीप्रमाणे घरातून निघाल्या होत्या. शिरसाड नाका येथे पुढील प्रवासासाठी बस किंवा रिक्षा पकडण्यासाठी त्या वज्रेश्वरी रस्त्याच्या दिशेने पायी चालत जात होत्या. त्यावेळी विरुद्ध दिशेने अत्यंत वेगाने आलेल्या एका मालवाहू आयवा ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की शिक्षिका ट्रकच्या चाकाखाली आल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

विद्यार्थी आणि शिक्षक हळहळले स्वीडन गोम्स या मस्कर पाडा शाळेतील विद्यार्थ्यांच्या अत्यंत लाडक्या शिक्षिका होत्या. त्यांच्या निधनाची बातमी शाळेत पोहोचताच सर्वत्र शांतता पसरली. आपल्या आवडत्या शिक्षिकेच्या जाण्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांनी ओक्साबोक्शी रडत एकच टाहो फोडला. तर, सहकारी शिक्षकांनी अश्रूपूर्ण नयनांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

शिरसाड नाक्यावरील बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर शिरसाड नाका हा वसई-विरारसह मुंबई, ठाणे, भिवंडी आणि गुजरातला जोडणारा महत्त्वाचा चौक आहे. या ठिकाणी दिवसभर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र, अवजड वाहनांची भरधाव गती आणि वाहतुकीच्या नियमांचे होणारे उल्लंघन यामुळे हा भाग अपघाताचा केंद्रबिंदू ठरत आहे. "भरधाव वेगाने आणि चुकीच्या बाजूने येणाऱ्या वाहनांमुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे, प्रशासनाने येथे तातडीने वाहतूक नियोजन करावे," अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

गुन्हा दाखल, पोलिसांकडून शोध सुरू

अपघाताची माहिती मिळताच मांडवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) बलराम पालकर, पोलीस कर्मचारी राजेंद्र फंड, विपुल आव्हाले आणि विशाल विसावे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. मांडवी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने फरार आयवा ट्रक आणि त्याच्या चालकाचा शोध घेतला जात आहे. "दोषी चालकाला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई केली जाईल," असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT