मणिपूर सालकरपाड्यातील रस्ता खुला करण्याची मागणी pudhari photo
पालघर

Palghar News : मणिपूर सालकरपाड्यातील रस्ता खुला करण्याची मागणी

विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थांची गैरसोय

पुढारी वृत्तसेवा

कासा ः डहाणू तालुक्यातील मौजे मणिपूर येथील सालकरपाडा परिसरातील एका व्यक्तीने गावातील वहिवाटीचा रस्ता अडवून बंद केल्याच्या प्रकरणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे धाव घेतली असून, हा रस्ता तातडीने पूर्ववत खुला करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. याबाबत ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी, डहाणू यांच्याकडे निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल घेत तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, डहाणू कार्यालयाने मंडळ अधिकारी, आशागड यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, मणिपूर येथील वहिवाटीचा जुना रस्ता रामजी लक्ष्मण सालकर यांनी अडथळा निर्माण करून बंद केला आहे. हा रस्ता जिल्हा परिषदेकडून दुरुस्त करण्यात आलेला असून, सालकरपाडा परिसरातील शेतजमिनींकडे जाण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

रस्ता बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. तसेच गावात सुरू असलेल्या घरकुल योजनेअंतर्गत बांधकाम साहित्य, विटा, सिमेंट आणि इतर आवश्यक वस्तू ने-आण करण्यासही अडथळे निर्माण होत आहेत. दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

याशिवाय, शेतकऱ्यांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून, शेतमालाची वाहतूक तसेच शेतीकामासाठी ये-जा करण्यासाठी तोच प्रमुख मार्ग आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची अडचण अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ता योजने अंतर्गत जिल्हा परिषदेकडून तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावर अतिक्रमण करून तो बंद करणे गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.

या संदर्भात सद्या धर्मा सालकर यांनी 20 एप्रिल 2026 रोजी तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, डहाणू यांनी मंडळ अधिकारी, आषागड यांना संबंधित गावात चौकशी करून आवश्यक कागदपत्रे, पंचनामा, स्पष्ट अभिप्राय आणि अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

ग्रामस्थांनी प्रशासनाने लक्ष घालून बंद करण्यात आलेला रस्ता तातडीने खुला करून विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT